मुख्य रस्त्यावर मेट्रोची कामे तर सेवा रस्त्यांवर पालिकेचे खोदकाम; ठाणेकरांच्या प्रवासाचा पाऊण तास वाहतूक कोंडीत खर्च

ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांसाठी मार्गरोधक उभारण्यात आल्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. त्यातच या महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर पालिकेच्या विभागांमार्फत मलवाहिन्या बदलण्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा दररोज अर्धा ते पाऊण तास अधिक वेळ वाहतूक कोंडी वाया जात आहे. या परिसरातील अंतर्गत रस्त्यांचीही कामे सुरू असल्याने येथील नागरिकांसाठी प्रवास म्हणजे कोंडी असे समीकरणच बनले आहे.

गेल्या काही वर्षांत घोडबंदर परिसरात मोठय़ा प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली असून या भागाचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या भागातील वाहतुकीसाठी मुंबई-अहमदबाद हा एकमेव मार्ग आहे.

त्यामुळे या मार्गावर सकाळ आणि सायंकाळ या गर्दीच्या वेळेत नोकरदार वर्गाच्या वाहनांचा भार असतो. तसेच या मार्गावरून दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अवजड वाहतूक सुरू असते. सतत वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे.

या कामासाठी महामार्गावर मार्गरोधक उभारण्यात आल्याने रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. महामार्गाचा रस्ता अरुंद झाला असतानाच महापालिकेने महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर मलवाहिन्या टाकण्याची कामे हाती घेतली होती. एकाच वेळी दोन्ही बाजूंचे सेवा रस्त्या मलवाहिन्यांच्या कामासाठी खोदण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली होती. याच मुद्दय़ावरून प्रशासनाच्या कारभारावर टीका होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तातडीची बैठक घेऊन ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. या आदेशाला दहा महिन्यांचा काळ लोटला तरी अजूनही सेवा रस्त्यांवरील कामे सुरूच असल्याचे चित्र आहे.

संबंधित विभागाकडून अजूनही मलवाहिन्या टाकण्याची कामे सुरू असून त्यासाठी गायमुख, कासारवडवली आणि आनंदनगर नाका या भागातील सेवा रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामांमुळे येथील वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली असून या नित्याच्या कोंडीमुळे पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ खर्ची पडत आहे. कोंडीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून दररोज शाळेत पोहोचण्यास विलंब होऊ लागला आहे.

अंतर्गत मार्गावरही कामे

कासारवडवली, ओवळा, कावेसर, आनंदनगर, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, आझादनगर, कोलशेत रोड, ढोकाळी, हायलँड या संपूर्ण पट्टय़ात काँक्रिटीकरण आणि भूमिगत गटारे बांधणे अशा कामांसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे याअंतर्गत मार्गावरही कोंडी होत आहे.

घोडबंदर मार्गावर दररोज सकाळ आणि रात्रीच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. मेट्रोची कामे सुरू असताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. महापालिकेने या मार्गावर कामे करण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.     – सोमनाथ डगळे, ठाणे.

पावसाळा संपल्यानंतर घोडबंदर येथील रस्त्याची कामे सुरू करण्यात आली होती. लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.        – संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका