मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या रांगा; सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे नोकरदारांचे हाल

ठाणे : गेल्या अडीच महिन्यांपासून टाळेबंदीमुळे आपापल्या घरातच अडकून पडलेल्या नागरिकांसाठी जगरहाटीची दारे सोमवारपासून खुली झाली खरी; पण टाळेबंदीच्या शिथिलीकरणाचा पहिला दिवस ठाणेकरांसाठी काहीसा तापदायकच ठरला. एकीकडे, खासगी कार्यालये खुली झाली असली तरी राज्य परिवहन तसेच अन्य परिवहन उपक्रमांच्या बसच्या अपुऱ्या सुविधेमुळे ठाण्यापासून बदलापूपर्यंत विविध बसथांब्यांवर प्रवाशांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले, तर दुसरीकडे सार्वजनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्याने आपापली वाहने घेऊन नोकरदार निघाल्याने ठाणे-मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यांसह मुंब्रा, शिळफाटा, दुर्गाडी-कोनगाव या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या या दुतर्फा कोंडीचा गैरफायदा घेऊन याही परिस्थितीत रिक्षाचालक अवाजवी भाडे आकारत होते.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावलेली टाळेबंदी शिथिल करताना राज्य सरकारने खासगी कार्यालयांना १० टक्के कर्मचारी उपस्थितीसह काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कामाचे ठिकाण गाठण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नोकरदारांची लगबग जवळपास ७५ दिवसांनंतर पुन्हा पाहायला मिळाली. मात्र, सार्वजनिक वाहतूक सुविधेच्या कमतरतेमुळे या प्रवाशांची धांदल उडाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर अशा सर्वच शहरांत हे चित्र दिसले. मुंबई, ठाण्यात काम करणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन, बेस्ट तसेच ठाणे, कल्याण, नवी मुंबई महापालिका परिवहनतर्फे विशेष बस गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. मात्र, गाडय़ांमधील प्रवासी क्षमतेवरील निर्बंध आणि मर्यादित गाडय़ांची संख्या यामुळे वाहतुकीचे नियोजन कोलमडले.

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या १०० बसगाडय़ा अत्यावश्यक सेवेसाठी चालवण्यात आल्या होत्या. टीएमटीच्या बहुतांश बसगाडय़ांचे मार्ग ठाणे रेल्वेस्थानक परिसराकडे जातात. मात्र, सध्या रेल्वे बंद असल्याने या बसचा कोणताही फायदा प्रवाशांना झाला नाही. ठाणे जिल्ह्य़ातील लांब पल्ल्याच्या म्हणजेच बदलापूर आणि कल्याण भागातील प्रवाशांची सोय व्हावी यासाठी बेस्टने बसगाडय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या गाडय़ांची संख्या अत्यंत अपुरी आहे. कल्याणहून यापूर्वी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंब्रा-खारीगावमार्गे सायन येथील राणी लक्ष्मी बाई चौकापर्यंत केवळ १५ बसगाडय़ा सोडण्यात येत होत्या, तर डोंबिवली पूर्वेत बाजीप्रभू चौकातून नवी मुंबई, पनवेल, मुंबई, मंत्रालय, ठाणे परिसरात जाण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका, मुंबई महापालिका, नवी मुंबई पालिका, ठाणे पालिका परिवहन आस्थापनांच्या बस सोडल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी या गाडय़ांची संख्या पुरेशी होती. त्यामुळे साथसोवळ्याचे नियम पाळणे आणि कर्मचाऱ्यांना रांगेतून सोडणे वाहतूक नियंत्रकांना शक्य होते. सोमवारी या ठिकाणी खासगी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे रांगा लावणेही नियंत्रकांना शक्य झाले नाही. डोंबिवलीतील थांब्यावर बसगाडी दाखल होताच प्रवासी झुंडीने बसमध्ये घुसताना पाहायला मिळाले.

टाळेबंदीच्या काळात बदलापूर शहरातून राज्य परिवहन मंडळाच्या दररोज दीडशे फेऱ्या होतात, तर बेस्ट बसच्या सरासरी ९२ फेऱ्या दररोज होत असतात. मात्र, सोमवारी टाळेबंदीत असलेल्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांपेक्षा खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बस स्थानक परिसरात गर्दी केली होती. गर्दी वाढली असली तरी राज्य परिवहन आणि बेस्टच्या फेऱ्या मात्र वाढल्या नसल्याचे येथील वाहतूक नियंत्रकांनी सांगितली. त्यामुळे गर्दीचे आणि बसचे नियोजन करण्यात या दोन्ही बससेवेच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत होती. त्यातही बेस्ट परिवहन सेवेतील बसमध्ये फक्त मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात असल्याने इतर कर्मचाऱ्यांना या बसचा फायदा होत नव्हता. त्यामुळे इतर शासकीय कर्मचारी, कामगार आणि खासगी कर्मचाऱ्यांना पूर्णत: राज्य परिवहन मंडळाच्या बसवर अवलंबून राहावे लागत होते. सकाळच्या वेळी बसची कमतरता असलेल्या बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वाहतूक कोंडीचाही दिवस

रेल्वे, बस अशी सार्वजनिक वाहतूक सेवा प्रवासासाठी उपलब्ध नसल्याने अनेकांनी स्वत:च्या दुचाकी आणि कारने कार्यालयापर्यंतचा प्रवास सुरू केला. सकाळच्या वेळेत एकाच वेळी ही वाहने रस्त्यावर आल्याने आनंदनगर, मुंब्रा बाह्य़वळण मार्ग, शिळफाटा, दुर्गाडी-कोनगाव रस्त्यावर कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळच्या वेळी सुरुवातीला कल्याणच्या दुर्गाडी पूल ते कोनगाव या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. याची माहिती बसचालकांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याने त्यांनी मार्ग बदलून काटई-शिळफाटामार्गे वाहतूक सुरू केली. यामुळे शिळफाटा मार्गावर वाहनांचा भार वाढून मोठी कोंडी झाली होती, तर यामुळे बदलापूरहून कल्याण पश्चिम, कोन गाव, भिवंडी, यामार्गे ठाणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. ठाणे  शहराच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाक्यावरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच तीन हात नाका येथून कोपरी पुलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही कोंडी झाली होती.

नोकरदार वर्गाची वाहने एकाच वेळी रस्त्यावर आली. त्यात अनेक ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असून काही ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, त्यामुळे  काही काळ कोंडी झाली.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा