30 May 2020

News Flash

मुंब्रा-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी

दुपापर्यंत मुंबई-नाशिक मार्गासह मुंब्रा भागातील आणि शीळफाटा मार्गावर काही प्रमाणात कोंडी कमी झाली होती

(संग्रहित छायाचित्र)

अवजड वाहनांचा भार वाढल्याने परिणाम

ठाणे / पनवेल : गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरांमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहतूक रोखून धरण्यात आली होती. मात्र, ही वाहतूक गुरुवारी पहाटे सुरू झाल्यानंतर महामार्गावर अवजड वाहनांचा भार वाढून अनेक ठिकाणी कोंडी झाली.

मुंब्रा-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कल ते तळोजादरम्यान पहाटे ६ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत मोठी वाहतूक कोंडी होती. या वाहतुकीचा भार वाढून मुंबई-नाशिक, शीळफाटा तसेच मुंब्रा बाह्य़वळण येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. गणेश विसर्जनामुळे अवजड वाहनांना महामार्गावर येण्यापासून गुरुवारी सायंकाळ ते गुरुवारी रात्री तीन वाजेपर्यंत थांबविण्यात आले होते. अवजड वाहन चालकांनी पहाटे पाच वाजल्यापासून महामार्गावर वाहतूक सुरू केली. एकाच वेळी ही वाहतूक सुरू झाल्याने कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांना विसर्जनासाठी मध्यरात्र झाल्याने रात्रपाळीचे पोलीसही रस्त्यावर वाहतूक नियमनासाठी उपलब्ध नसल्याने कोंडीत अधिकच वाढ झाली.

सकाळी सात वाजल्यापासून पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर यांच्या पथकाने रोडपाली सिग्नल, कळंबोली सर्कल, नावडेपर्यंत वाहतूक नियमन केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. मात्र तोपर्यंत पाच किलोमीटर दूर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका कामगारांना बसला. कारखान्यातील कामगारांची वाहतूक करणाऱ्या बस कोंडीत अडकल्या. सिडको मंडळाने रस्त्यांची दुरुस्ती केली नसल्यामुळे रोडपाली सिग्नल येथील उड्डाणपुलावरून औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या वाहनांना सुमारे दोन फूट खडय़ातून वाहने चालवावी लागली.

मुंब्रा-पनवेल मार्गावरील अवजड वाहतुकीचा भार वाढून कळंबोली सर्कल ते तळोजाप्रमाणेच मुंबई-नाशिक, शीळफाटा तसेच मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यात मुंबई-नाशिक महामार्गावर मोठे खड्डे पडले असल्यामुळे भिवंडी तसेच नाशिकहून जेएनपीटीच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक संथगतीने सुरू होती. यामुळे कोंडीत भर पडली. एक किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा तासांचा अवधी लागत होता. दुपापर्यंत मुंबई-नाशिक मार्गासह मुंब्रा भागातील आणि शीळफाटा मार्गावर काही प्रमाणात कोंडी कमी झाली होती. मात्र या मार्गावरील वाहतूक सायंकाळपर्यंत पूर्णपणे सुरळीत झालेली नव्हती. या कोंडीचा परिणाम कल्याण आणि महापे मार्गावर झाला. या मार्गे सायंकाळी कामावरून घरी परतत असलेल्या नागरिकांनाही कोंडीचा सामना करावा लागला.

शीळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडीचा समस्या सोडविण्यासाठी शीळ-महापे मार्गावर गणेशोत्सवानंतर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात येणार होती. मात्र, या बदलाची पूर्णपणे तयारी झालेली नसल्यामुळे शुक्रवारपासून हे बदल लागू करण्यात आले नाहीत. दोन ते तीन दिवसानंतर हे बदल लागू केले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 6:11 am

Web Title: heavy traffic jams on mumbra panvel highway zws 70
Next Stories
1 तरुणीवर लैंगिक अत्याचार
2 डेंग्यूमुळे दोन महिलांचा मृत्यू
3 रूळ बदलताना  गाडी ‘भरकटली’
Just Now!
X