02 December 2020

News Flash

घोडबंदरचा प्रवास तापदायक

मेट्रोच्या कामांचे अडथळे, त्यात सेवारस्त्यांची दुर्दशा

घोडबंदर परिसरातील सेवा रस्ते उखडले असून प्रवासासाठी धोकादायक बनले आहेत.

मेट्रोच्या कामांचे अडथळे, त्यात सेवारस्त्यांची दुर्दशा; वाहतूक कोंडीने चालक हैराण

ठाणे : कोटय़वधी रुपयांचे गृहप्रकल्प आणि मोठय़ा विकास प्रकल्पांची होत असलेली पायाभरणी यामुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या घोडबंदर मार्गावरील प्रवास मात्र येथील रहिवाशांसाठी दिवसेंदिवस तापदायक ठरू लागला आहे. मेट्रोची कामे आणि सेवारस्त्यांची झालेली दुर्दशा यामुळे येथील मुख्य मार्गावरील प्रवास धोकादायक आणि तितकाच कोंडीचा ठरत असताना ढोकाळी, कोलशेत, आझादनगर भागांत सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि ब्रह्मांड, बाळकूम, कासारवडवली येथील अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळण यामुळे येथील अंतगर्त रस्तेही प्रवासासाठी नकोसे होऊ लागले आहेत.

नवीन ठाणे म्हणून ओळख असलेल्या घोडबंदर भागात गेल्या काही वर्षांत गगनचुंबी इमारती आणि मोठय़ा नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत. मुंबई तसेच उपनगरात कामानिमित्त जाणारे लाखो रहिवासी येथे वास्तव्यास आले असून यामुळे या मार्गावरील वाहनसंख्या काही पटींनी वाढली आहे. असे असले तरी या भागात अजूनही पायाभूत सुविधांची म्हणावी त्या प्रमाणात पायाभरणी झालेली नाही. गेल्या अडीच वर्षांपासून घोडबंदरच्या मुख्य मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग मेट्रोच्या अडथळ्यांमुळे अरुंद झालेला आहे. मेट्रोचे काम सुरू असल्याने येथे वाहनकोंडी होणार हे ठरलेले होते. असे असताना या मार्गालगत असलेल्या सेवारस्त्यांची डागडुजी करण्यातही महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने हलगर्जी दाखवली.

सेवारस्त्यावर गायमुख ते पातलीपाडापर्यंत मलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले होते. काम प्रू्ण झाल्यानंतर हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे पर्यायी मार्गही बंद असल्यात जमा आहे. हा धोकादायक प्रवास टाळण्यासाठी दररोज ठाण्यात ये-जा करणारे अनेक जण त्यांच्या खासगी वाहनांनी अंतर्गत मार्गाची निवड करत असतात. नुकत्याच झालेल्या पावसाळ्यात याअंतर्गत मार्गाचीदेखील चाळण झाली आहे. ब्रह्मांड, वाघबीळ-आनंदनगरअंतर्गत मार्ग येथेही महापालिकेने मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याची कामे हाती घेतली होती. या रस्त्याची व्यवस्थित डागडुजी केली नसल्याने संपूर्ण खडी रस्त्यावर आली आहे. असमान रस्त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत. कासारवडवली येथील पोलीस ठाणे रस्ता तसेच साई नगरच्या दिशेने जाणारा रस्ताही वाईट अवस्थेत आहे. या भागात रस्त्यावर धुळीचे साम्राज्य तयार झाले असून वाहनचालकांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. कोलशेत, ढोकाळी आणि आझादनगर परिसरांत महापालिकेने रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहे. हे काम करण्यासाठी आणखी आठ ते नऊ महिने जाऊ शकतात, असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकेरी मार्गाने येथील वाहतूक सुरू आहे. त्याचा परिणाम येथील वाहतुकीवर होऊन वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

मुख्य मार्गाची दैना झाल्यामुळे प्रवाशांचा भार ब्रह्मांड येथून अंतर्गतमार्गे कासारवडवली या मार्गावर येत असतो. मात्र अंतर्गत रस्तेही खराब झाल्यामुळे येथून प्रवास करणेही जिकिरीचे बनले आहे. या भागात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी घसरून अपघाताची शक्यताही आहे. यासंबंधी ठाणे महापालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

अभियंता विभागाचा नाकर्तेपणा आयुक्तांच्या अंगलट

करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेतील प्रशासन जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी गेल्या तीन महिन्यांच्या काळात करोनाला अटकाव घालण्यासाठी जोमाने प्रयत्न केले. मात्र, अभियंता विभागाच्या सुस्त कारभाराचा फटका आयुक्त शर्मा यांनाही सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौऱ्यात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. घोडबंदर तसेच इतर परिसरात पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेत सातत्याने दोष निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहे. याशिवाय रस्त्यांची डागडुजी, संथगतीने सुरू असलेली कामे यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. असे असताना आयुक्त म्हणून डॉ. शर्मा यांच्या भूमिकेकडे  सर्वाचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:43 am

Web Title: heavy traffic on ghodbunder road due to diwali festival zws 70
Next Stories
1 ठाण्यातील बाजारपेठांत दिवाळीचा दिमाख!
2 कल्याण-डोंबिवलीत रुग्णदुपटीचा वेग २०६ दिवसांवर
3 कोकण विभागात रक्तद्रव दानात ठाणे शहर अव्वल
Just Now!
X