धोकादायक असल्याने वीजवाहक वाहिन्या बंद करण्याचे आदेश

डोंबिवलीतील धोकादायक कोपर उड्डाणपुलाच्या पदपथावरून टाकण्यात आलेल्या वीजवाहक वाहिन्या येत्या आठवडाभरात काढून टाकाव्यात, असे आदेश मध्य रेल्वेच्या अभियंता विभागाने महावितरणच्या अभियंत्यांना दिले आहेत. कोपर उड्डाणपुलावरील डेक स्लॅबची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम रेल्वेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या पुलावरील वीजवाहक वाहिन्या काढून टाकण्यात याव्यात, असे रेल्वेने म्हटले आहे.

अत्यावश्यक कामासाठी रेल्वेने पुलावरील पदपथ काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे. या कामात अडथळा नको म्हणून कोपर पुलावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. फक्त हलकी वाहने या पुलावरून सोडण्यात येत आहेत. मुंबई ‘आयआयटी’तील तज्ज्ञांनी मे महिन्यात कोपर उड्डाण पुलाची पाहाणी करून हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल मध्य रेल्वेला दिला आहे.

त्यानंतर रेल्वेने तातडीने हा पूल बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, शहरातील हा महत्त्वपूर्ण पूल बंद केला तर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी शहरात होईल असे पालिका, लोकप्रतिनिधींनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यानंतर पालिका, रेल्वेने टप्प्याने हा पूल दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोंडीस सुरुवात

नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमाने कोपर उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालय येथून नवी मुंबईतील वाशी, सीबीडी येथे सोडण्यात येणाऱ्या बस पूर्व भागातील एस. के. पाटील शाळा चौकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अवजड वाहनांमध्ये शाळेच्या बसचा समावेश आहे. शाळेच्या बसचालकांना ठाकुर्ली उड्डाणपुलावरून फेरा घेऊन डोंबिवली पश्चिमेत यावे लागते. या उलटसुलट फेऱ्यामुळे वाहनचालकांची दमछाक होत आहे. एकाच वेळी शाळेच्या बस ठाकुर्ली पुलावर येत असल्याने याठिकाणी कोंडीला सुरुवात झाली आहे. कोपर पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हे अनेक वाहनचालकांना माहिती नसल्याने ही वाहने कोपर पुलाजवळ आली की वाहतूक पोलिसांकडून अन्य मार्गाने त्यांना जाण्याची सूचना केली जाते. त्यामुळे कोपर पुलाच्या दोन्ही बाजूला ही वाहने वळवताना कोंडी होत आहे. दत्तनगर, डोंबिवलीतील महात्मा फुले रस्ता, गुप्ते रस्ता, दीनदयाळ रस्त्यांच्या चौकात अवजड वाहने कोपर पुलावर नेण्यास बंदी आहे, असे फलक लावले तर कोपर पुलाजवळ कोंडी होणार नाही, असे रहिवाशांनी सांगितले.