मोठय़ा वाहनांच्या पार्किंगसाठी बाळकुम येथे वाहनतळ

ठाणे शहरातून जाणाऱ्या महामार्गालगत तसेच घोडबंदर, वागळे इस्टेट परिसरात रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने बाळकुम भागात आरक्षित केलेल्या तीन हेक्टर जागेवरील वाहनतळास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पालिकेच्या विकास आराखडय़ात हा भूखंड एसटी महामंडळाचे बस आगार तसेच अन्य कामांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, विनावापर वर्षांनुवर्षे पडून असलेल्या या जागेचा वापर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी करण्याचा फेरबदलाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने आता शहरात येणाऱ्या अवजड वाहनांच्या कोंडीचा प्रश्न सुटू शकणार आहे.

ठाणे शहरात दैनंदिन दळणवळणाकरिता ट्रक, टेम्पो, बसगाडय़ा तसेच अवजड वाहनांचा राबता गेल्या काही वर्षांपासून वाढला असून या वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ नसल्याने वाहतूक नियोजनाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शहरातील खासगी ठेकेदारांच्या मोठय़ा बसगाडय़ा  सकाळ, रात्रीच्या वेळेत रस्त्यांच्या कडेला उभ्या केल्या जातात. त्यामुळे अरुंद रस्त्यांची समस्या असलेल्या भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी राहिली आहे. जुन्या शहरासह वागळे इस्टेट, घोडबंदर सेवा रस्ते तसेच महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर ही अवजड वाहने तसेच शाळेच्या बसेस उभ्या केल्या जात असल्याने या भागात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहनांवर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जात असली तरी हा वरवरचा उपाय ठरत होता. त्यामुळे ठाणे महापालिकेने बाळकूम येथील जागेत अवजड वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उभी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

बाळकुम येथील हा भूखंड एसटी महामंडळाच्या कार्यशाळेसाठी (वर्कशॉप) आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र, महामंडळाने बाळकुम येथील २.२५ हेक्टरचा आरक्षणाचा भूखंड अद्यापही ताब्यात घेतलेला नाही. शिवाय नौपाडा येथील भूखंडदेखील विनावापर पडून आहे. त्यातच महामंडळाच्या खोपट येथील कार्यशाळेचा पुनर्विकास केल्यानंतर बऱ्यापैकी मोकळी जागा महामंडळाकडे उपलब्ध झाली आहे. हा मुद्दा अधोरेखित करत ठाणे महापालिकेने एसटी महामंडळाच्या कार्यशाळेसाठी अन्यत्र आरक्षित करण्यात आलेले भूखंड परत घेण्याची प्रक्रिया वर्षभरापूर्वी सुरू केली होती. त्यामुळे हा भूखंड परत मिळविण्यासाठी महापालिकेने हाचलाची सुरू केल्या होत्या. महापालिकेने परिवहन महामंडळाकडे पाठपुरावा करून यासंबंधी सुनावणी घेतली. महामंडळाने लेखी म्हणणे सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. महामंडळास महापालिकेने यासाठी १५ दिवसांची मुदत देऊ  केली होती. मात्र, या कालावधीत महामंडळाने ठोस म्हणणे मांडले नसल्याने हा भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, त्यावर राज्य सरकारच्या मंजुरीची मोहर उमटणे गरजेचे होते. नगरविकास विभागाने या प्रस्तावास गुरुवारी मान्यता दिली असून यामुळे शहरातील अवजड वाहने तसेच शाळेच्या बसेससाठी पार्किंगची व्यवस्था होणार आहे. ठाणे शहरात अवजड वाहनांसाठी स्वतंत्र अशा पार्किंगसाठी मिळालेला भूखंड लवकरच विकसित केला जाईल, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.