मुंब्रा बावळण रस्त्याच्या कामासाठी वाहतूक पोलिसांचे नियोजन

वाहतूक बदलांचे नियोजन आणि सूचना फलकांच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेल्या मुंब्रा बाह्य़वळण मार्ग दुरुस्तीच्या कामाला येत्या मंगळवारपासून अखेर सुरुवात होणार आहे. हे काम करत असताना ठाणे, नवी मुंबईला वाहतूक कोंडीचा विळखा बसू नये यासाठी भिवंडी, नाशिक आणि गुजरातच्या दिशेने होणारी वाहतूक पर्यायी तीन मार्गावरून वळविण्याचा निर्णय गुरुवारी वाहतूक पोलिसांनी जाहीर केला. नवी मुंबईतील सिडको आणि तलासरीतील दापचरी येथील मोकळ्या भूखंडावर अवजड वाहने थांबवून ती टप्प्याटप्प्याने शहरात सोडण्यात येणार आहे. याशिवाय जेएनपीटीमार्फत वाहनचालकांना टोकन दिले जाणार असून त्यामध्ये ठरवून दिलेल्या वेळेत आणि मार्गावरूनच अवजड वाहनांना वाहतूक करावी लागणार आहे. ठाणे शहरामध्ये दुपार आणि रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीचे काम मंगळवार, २४ एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी दोन महिन्यांचा अवधी लागणार असून तोपर्यंत येथील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक तीन पर्यायी मार्गावरून वळविण्यात येणार यासंबंधी गुरुवारी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना जाहीर केली. यानुसार घोडबंदर मार्गावरील वाहतूक नियंत्रित पद्घतीने सोडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरातून ठाण्याच्या दिशेने दिवसाला दहा ते पंधरा हजार अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांना जेएनपीटीकडून टोकन दिले जाणार आहे. त्यानुसार या वाहनांचे मार्ग आणि त्यांनी प्रवास सुरू करायची वेळ ठरवून दिली जाणार आहे. ठरवून दिलेल्या मार्गाचा भंग केल्यास संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई करून पुन्हा माघारी पाठवले जाणार आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली. मुंब्रा शहरात सद्यस्थितीत अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र, वळण रस्त्यांच्या बंदी काळात शहरातून रात्रीच्या वेळेस जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्ग ते वाय जंक्शन अशा सात किमी अंतराच्या मार्गावर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. पनवेल विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम केले जाणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाचे मजबुतीकरण, बेअरिंग बदलणे, पुलाच्या जोडणीतील अंतराची नव्याने बांधणी आणि रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.