नीलेश पानमंद / किशोर कोकणे

वाहतूक पोलीस यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव, कोंडीमुळे नागरिकांचे हाल 

ठाणे शहरात गर्दीच्यावेळी अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातल्यानंतरही ती रस्त्यावर येत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण वाहतूक पोलीस यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ठाणेकरांची रस्तेकोंडी झाली आहे.

अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी सकाळ आणि सायंकाळी शहरात अवजड वाहतुकीवर बंदी घातली आहे. परंतु, बंदी कालावधीतही अवजड वाहने शहरात प्रवेश करीत आहेत. उरण येथील जेएनपीटी बंदरातून भिवंडी, नाशिक तसेच गुजरातच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. त्यासाठी नवी मुंबई, ठाणे, घोडबंदर, मुंब्रा आणि कळवा या भागांतील मार्गाचा वापर करण्यात येतो. परिणामी वाहतूक कोडींचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनला आहे.

सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत नोकरदारांची वाहने मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर असतात. या वेळेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अवजड वाहतुकीचे वेळापत्रक आखले. त्यानुसार अवजड वाहनांना रात्री १० ते पहाटे ५, तर दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरात प्रवेश दिला जातो. उर्वरित वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास बंदी आहे. असे असतानाही काही महिन्यांपासून मनाईच्या कालावधीतही शहरातील रस्त्यांवर अवजड वाहने राजरोसपणे धावतात आणि पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात.

जेएनपीटी बंदरातून येणारी अवजड वाहने ऐरोली, आनंदनगर, ठाणे, घोडबंदरमार्गे गुजरातच्या दिशेने जातात. याच मार्गावरून नाशिक आणि भिवंडीला जाणारी वाहनेही जातात. याशिवाय, पनवेल, शिळफाटा, मुंब्रा बाह्य़वळण, खारेगावमार्गेही अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. गुजरात येथून जेएनपीटी बंदराकडे अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे ठाणे शहरात बंदीच्या वेळेत अवजड वाहनांना अटकाव करण्याची  जबाबदारी पालघर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई पोलिसांची आहे. मात्र, अवजड वाहने आपल्या हद्दीत अडवली तर कोंडी होईल, या भीतीने त्यांना पुढे सोडले जाते. त्यामुळे ठाणे शहरात दिवसभर अवजड वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.

वाहतुकीचे अवघड दुखणे

अवजड वाहने बंदीच्या वेळेत सोडू नका, असे पत्र संबंधित यंत्रणांना यापूर्वीच देण्यात आले आहे. नियंत्रण कक्षालाही तसे कळविण्यात आले आहे. शहरात सोडलेली अवजड वाहने थांबविणे किंवा माघारी पाठविणे अशक्य असते. अशावेळी ही वाहने कोंडीस कारणीभूत ठरतात, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलीस दलातील सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण वाहतूक पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

दररोज ९०० अवजड वाहनांची वाहतूक

मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर दररोज सुमारे ८०० ते ९०० अवजड वाहने धावतात. भिवंडीतही हे प्रमाण हजारांच्या आसपास आहे. महिनाभरात दोन-तीन वेळा नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांना अवजड वाहतूक सोडू नये, असे कळविले होते. मात्र, ते पुरेसे सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे आमच्या पोलिसांना त्यांच्या हद्दीत जाऊन अवजड वाहतूक थांबवावी लागते, असे ठाणे वाहतूक पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.