जिल्हाधिकाऱ्यायांचे आश्वासन; मदत शिबिरात अन्न, वैद्यकीय सेवा उपलब्ध

पालघर : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताळेबंद लागू करण्यात आल्यामुळे पालघर जिल्ह्यात असलेल्या परराज्यातील कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे, तर अनेक कामगार बेघर झाले आहेत. या कामगारांना मदत शिबिरात अन्न, पाणी, वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. जे कामगार भाडेकरू आहेत, अशा कामगारांना घरमालकाने या परिस्थितीत काढू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांचा ताळेबंद जाहीर करण्यात आला असून या कालावधीत जे कामगार कामावर उपस्थित राहू शकत नाही, अशा कामगारांना कोणत्याही आस्थापनाने कामावरून काढू नये, तसेच भाडेकरूंना घरमालकाने या परिस्थितीमध्ये घर सोडण्यास सांगू नये. तसेच इतर राज्यांतून पालघर जिल्ह्यामध्ये रोजगारासाठी आलेले कामगार व कर्मचारी आणि इतर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची संख्या पालघर जिल्ह्यामध्ये चार हजारांहून अधिक असून या व्यक्तींना रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने ते पालघर जिल्ह्यामध्ये अडकून पडले आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा ते भागवू शकत  नाहीत, अशा व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने मदत शिबिरामध्ये निवारा उपलब्ध करून दिला असून त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय मदत दिली जात आहे.

तसेच करोना विषाणूचा प्रादुर्भाव कसा रोखावा याबाबत जनजागृती करण्यात येते. राज्यस्तरावर याबाबतीत काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती तयार करण्यात आली आहे.

विलगीकरण कक्षाची स्थापना

ज्या रुग्णांमध्ये करोना संसर्गाची लक्षणे आढळून येतील त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बोईसर येथील टिमा रुग्णालय हे अधिग्रहित करण्यात आले आहे. या रुग्णालयात ४० खाटांचे अद्ययावत विलगीकरण कक्ष तयार केले आहे. त्या ठिकाणी स्वतंत्र डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाना २४ तास सेवा देण्यासाठी नियुक्त केले आहे. या सर्वांची निवासाची व्यवस्था खासगी हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यायांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील व्यक्ती इतर राज्यांत रोजगारानिमित्त वास्तव्यास असेल किंवा राज्यात इतरत्र असेल अशा कामगारांना संबंधित राज्यातील प्रशासनाने आणि सेवाभावी संस्थांनी मदत करावी. अडकून पडलेल्या किंवा रोजगार नसल्याने बेघर झालेल्या व्यक्तींना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत द्यावी.

– डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी