डॉ. प्रकाश आमटे यांचे स्पष्टीकरण; आहे त्यातच सुख मानण्याचा सल्ला
समाजात खूप काही करण्यासारखे आहे. अनेकांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. ‘हेमलकसातील जीवनशैलीवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक जण तेथे येऊन मदत करू इच्छितात; परंतु तेथील वास्तव हे प्रत्यक्षात फार वेगळे आहे. चित्रपट किंवा पुस्तकाच्या माध्यमातून ते मांडता येण्यासारखे नाही, तो केवळ एक प्रयत्न होता. तेथे येऊन मदत करण्यापेक्षा आजूबाजूला असणाऱ्या गरजूंना मदत करा, असे आवाहन पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी येथे केले.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यांच्या वतीने सोमवारी येथील रोटरी भवनमध्ये डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्याचे लोकांचे राहणीमान हे धावपळीचे झाले आहे. या धावपळीच्या युगात प्रत्येकालाच इच्छा असून गरजूंना मदत करण्यासाठी हेमलकसासारख्या भागात जाता येत नाही; परंतु त्यांना तेथे जाण्याची गरजही नाही. आपल्या आजूबाजूला आजही अनेक लोक आहेत, ज्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. मग ती मदत कोणत्याही स्वरूपातील असेल ती करा. त्यातून तुम्हालाही समाधान मिळेल आणि गरजवंतांची गरजही भागली जाईल, असा सल्ला आमटे यांनी दिला.
सिनेमातून दिसलेले आणि प्रत्यक्षातले हेमलकसा यात बरीच तफावत आहे. चित्रपटातून केवळ दहा टक्केच वास्तव दिसले, असे नमूद करून त्यांनी तेथील भौगोलिक समस्यांची माहिती दिली. त्या लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्याकडे शहरी भागाप्रमाणे कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. मात्र तरीही त्यात ते खूश आहेत. आपल्याकडे जे आहे त्यात सुखी राहायला माणसाने शिकले पाहिजे, अर्धाअधिक तणाव तिथेच संपेल. आपण आपल्याकडे जे आहे, त्याचा विचार न करता जे नाही, त्याच्या काळजीत जास्त रमतो. सकारात्मक विचार करून दुसऱ्यांचे जीवनमान उजळविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य फुलेल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यांच्या वतीने हेमलकसा या प्रकल्पासाठी एक लाख २५ हजार रुपयांची, शहरातील काही मान्यवरांनी दीड लाखाची मदत याबरोबर खासगी संस्थेने एक लाख ५१ हजारांचा धनादेश देणगी स्वरूपात दिल्याची माहिती रोटरीच्या वतीने देण्यात आली.

हिंस्र प्राण्यांची भीती वाटत नाही का?
कार्यक्रमाला आलेल्या विद्यार्थ्यांनी चित्रपटात प्राण्यांशी दाखविलेली तुमची जवळीक खरी आहे का, तुम्हाला त्यांची भीती वाटत नाही का, ते हिंस्र प्राणी तुमच्यासोबत पाळीव प्राण्यांसारखे कसे वागतात, आदी अनेक प्रश्न विचारले. यावर त्यांनी प्राण्यांशी कशी जवळीक वाढली, त्यांना प्रेम-माया दिली तर तेही तुमच्यावर प्रेम करतात आणि नंतर त्यांचा लळा लागतो, असे त्यांनी सांगितले.

There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने