भगवान मंडलिक

राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या बंदीसाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. तरीही कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांकडून ग्राहकांना दिल्या जात आहेत. या पिशव्यांची विक्री उल्हासनगर क्रमांक दोन येथील नेहरू चौक परिसरातील प्लास्टिक व्यवसायातील एक बडा व्यापारी करत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर निर्बंध  घातले आहे. प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. मात्र उल्हासनगरमधील हा बडा व्यापारी बिनधास्तपणे संध्याकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत आपल्या दुकानात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करत आहे, अशी माहिती या भागात खरेदीसाठी येणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली. दिवसा या दुकानात प्लास्टिक पिशव्यांचा साठा नसतो. असला तरी तो दडवून ठेवला जातो किंवा गोदामातून आणला जातो. संध्याकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीचा व्यवसाय तेजीने चालतो. या पिशव्या खरेदीसाठी डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, भिवंडी परिसरांतील किरकोळ, किराणा, घाऊक पद्धतीने व्यवसाय करणारे दुकानदार येतात.

सध्या कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली रेल्वे स्थानक भागांतील फेरीवाले, अनेक दुकानदार, फेरीवाले, व्यापाऱ्यांच्या दुकानात भाजीपाला, किरकोळ वस्तू देण्यासाठी सर्रास बंदी असलेल्या तकलादू नवीन प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात. बंदी असूनही नवीन उत्पादित केलेल्या या पिशव्या पाहून खरेदीदारही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या पिशव्या उल्हासनगरमधील नेहरू चौक भागातून विकल्या जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उल्हासनगरमध्ये छुप्या पद्धतीने, उघडपणे कोणी व्यापारी प्लास्टिकच्या पिशव्यांची विक्री करीत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात.तरीही, या कारवाईला आव्हान देत नेहरू चौक परिसरात कोणी व्यापारी संध्याकाळच्या वेळेत छुप्या पद्धतीने प्लास्टिक पिशव्यांची विक्री करत असेल तर त्या भागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत पाळत ठेवण्यात येईल. संबंधित व्यापाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल.

– डॉ. युवराज भदाणे, उपायुक्त (जनसंपर्क), उल्हासनगर महापालिका