पालिकेचे अधिकारी असल्याने सेवेत घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सुहास बिऱ्हाडे, वसई

आपल्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी करू नये म्हणून शिवसेना नगसेवकास एक कोटी रुपयांची लाच देऊ  करणारे महापालिकेचे निलंबित वादग्रस्त उपसंचालक वाय. एस. रेड्डी पुन्हा पालिकेत रुजू होणार आहेत. रेड्डी यांनी उच्च न्यायालयात सिडको विरोधातील खटला जिंकला असून उच्च न्यायालयाने रेड्डी यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले आहेत.

यमीगणू शिवगोपाळ रेड्डी (५०) हे सिडकोतून वसई-विरार महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आले होते. ते पालिकेच्या नगररचना विभागात उपसंचालक पदावर कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी शहरात बेसुमार अनधिकृत बांधकामे सुरू होती. शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावडे यांनी या अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केली होती.

रेड्डी यांच्या विरोधात शिवसेना गटनेते धनंजय गावडे यांनी न्यायालयात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी केल्या होत्या. आपल्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील म्हणून रेड्डी यांनी गावडे यांच्याशी संपर्क करून तक्रारी न करण्याची विनंती केली होती. मात्र गावडे यांनी त्यांच्या विरोधात माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागवून तक्रारी करणे सुरू ठेवले होते.

गावडे जुमानत नसल्याने रेड्डी यांनी गावडे यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखवले होते. त्यामुळे गावडे यांनी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे रेड्डी यांच्याविरोधात तक्रार केली. लाचेच्या रकमेचा २५ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना रेड्डी यांना अटक करण्यात आली होती. रेड्डी हे सिडकोचे अधिकारी असल्याने आयुक्तांनी सिडकोकडे प्रस्ताव पाठवला होता आणि सिडकोने त्यांना निलंबित केले होते.

रेड्डी सिडकोतून प्रतिनियुक्तीवर आले होते तरी महापालिकेने २०१२ मध्ये ठराव करून त्यांना सेवेत घेतले होते. त्यामुळे आपल्या निलंबनाविरोधात रेड्डी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सिडकोविरोधात त्यांनी दावा केला होता. त्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिला आणि रेड्डी हे पालिकेचे अधिकारी असल्याचे सांगत पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे रेड्डी यांचा पुन्हा पालिकेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महासभेत त्यांच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. रेड्डी यांची नियुक्ती ही न्यायालयाची बाब असल्याने पालिका आयुक्तांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

चौकशी करण्याची मागणी

रेड्डी लाच प्रकरणात अटक होण्यापूर्वी अनेक वर्षे महापालिकेत होते. त्यांच्या बदलीसाठी अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. ते पुन्हा पालिकेत येणार असल्याने खळबळ उडाली आहे. रेड्डी यांच्याविरोधात ज्या तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्याचे काय झाले, या प्रकरणांची चौकशी करा, अशी मागणी भाजपाचे मनोज पाटील यांनी केली आहे. रेड्डी पुन्हा पालिकेत येत असतील तर ती शहरासाठी सर्वात मोठी शोकांतिका आणि दुर्दैव असेल, असे ते म्हणाले. रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.