हर्षद कशाळकर harshad.kashalkar@expressindia.com

हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम केलेल्या काही अभिनेत्रींना हाताशी धरून, त्या नऊ जणांनी देहविक्रीचा उद्योग थाटला होता. उच्चभ्रू वर्गातील व्यक्तींकडून लाखो रुपये देऊन त्यांना मुली पुरवल्या जात असत. ग्राहकांच्या गरजेनुसार अमली पदार्थाचाही पुरवठा केला जात होता. मात्र, चार भिंतींच्या आड चालणारा हा धंदा पोलिसांनी उधळून लावला.

अलिबाग तालुक्यातील आलिशान बंगल्यामध्ये अनैतिक धंदे आणि रेव्ह पाटर्य़ाचे आयोजन होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. मात्र कारवाईसाठी ठोस पुरावा काही पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. चार भिंतींच्या आत अत्यंत गुप्तपणे चालणाऱ्या या अनैतिक उद्योगांवर कारवाई करावी तरी कशी, असा प्रश्नही पोलिसांना भेडसावत होता. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधीक्षक संजय गुंजाळ यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.  पण तपासाची सुरुवात कशी आणि कुठून करायची असा पेच त्यांच्या समोर होता. त्यामुळे तपासाची दिशाच ठरत नव्हती.

कारवाई करताना पोलिसांना खबरदारी बाळगणे गरजेच होते. कारण यात गुंतलेल्या व्यक्ती उच्चभ्रू समाजातील होत्या. तपासात केलेली छोटीशी चूक आंगलट येण्याची शक्यता जास्त होती. ठोस पुरावे असल्याशिवाय कारवाई करणे अशक्यच होते. कारावाई करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून घेणे आवश्यक होते. त्यामुळे सुरुवातीला केवळ गुप्त खबऱ्यांकडून माहिती संकलित करण्यावर पोलिसांनी भर दिला. अलिबाग ते मांडवा यादरम्यान भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या आलिशान बंगल्यांची माहिती संकलित करण्यात आली. यानंतर येथे काम करणाऱ्या कामगारांशी ग्राहक बनून संपर्क साधण्यास सुरुवात केली, पण काही सुगावा हाती लागत नव्हता. तपास पुन्हा एकदा शून्यावर येऊन थांबत होता.

पर्यटक असल्याचा बनाव करून गेलेले पोलीस कर्मचारी रिक्त हाताने परत येत होते. त्यामुळे तपासाचा गुंताही सुटत नव्हता. अशातच किहीम परिसरात अशा पाटर्य़ाचे आयोजन होत असल्याची पक्की खबर पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे तपासाला ठोस दिशा मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून त्या बंगल्यांमधील व्यवस्थापकांशी संपर्क साधला. वाढदिवसासाठी भव्य पार्टीचे आयोजन करायचे असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र पार्टीसाठी वाटेल ती रक्कम देण्याची तयारी दाखवल्यानंतर व्यवस्थापकांनी दोन महिलांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले.

या दोन्ही महिलांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी ग्राहकांची खात्री करण्यासाठी ठरावीक रक्कम बँक खात्यात जमा करण्यास सांगितली. त्याप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली. ठरलेली रक्कम जमा झाल्याची खात्री पटल्यावर दोघींनी त्यांच्या संपर्कात असलेल्या चित्रपट आणि मालिकांमधील काही अभिनेत्रींची नावे ग्राहकांना उपलब्ध करून दिली. मुलींची नावे निश्चित करून सौदा ठरवण्यात आला.

किहीम येथील दोन बंगले या पार्टीसाठी आरक्षित करण्यात आले. बनावट ग्राहकांना पैसे देऊन बंगल्यावर पाठवण्यात आले. ठरल्याप्रमाणे या सात मुलींना घेऊन नऊ जण बंगल्यावर दाखल झाले. पोलिसांनी सापाळा रचलाच होता. ग्राहकांच्या वेशातील पोलिसांनी इशारा देताच बंगल्यावर छापा टाकण्यात आला आणि सर्वाना ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेत तीन पोलीस अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अंगझडतीदरम्यान दोन महिलांकडे २६ ग्रॅम कोकेनही आढळून आले.

पोलिसांनी या प्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम आणि आमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत नऊ जणांवर गुन्हा दाखल केला. तर देहव्यापारासाठी आणलेल्या सात मुलींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. यात दोन प्रथितयश अभिनेत्रींचा समावेश होता. यातील एकीने नावाजलेल्या हिंदी चित्रपटातही काम केले होते. याच प्रकरणात दोन दिवसांनी कोकेन पुरविणाऱ्या पाच जणांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. यात दोन नायजेरियन तरुणांचा समावेश आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या अलिबाग सत्र न्यायालयात सुरू असून सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत. तर देहव्यापारासाठी आलेल्या मुलींना पालकांच्या ताब्यात देऊन सुटका करण्यात आली आहे.  या प्रकरणामुळे हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलेल्या मुलींच्या साह्यने चालणाऱ्या एका उच्चभ्रू सेक्स रॅकेट आणि अमली पदार्थ तस्करीचा उलगडा झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख, सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, पोलीस उपनिरीक्षक बुरुंगळे यांच्यासह २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.