19 February 2019

News Flash

बुलेट ट्रेन प्रकल्पग्रस्त अंधारात

तपशील देण्यात राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाची दिरंगाई

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| किन्नरी जाधव

तपशील देण्यात राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाची दिरंगाई

बुलेट ट्रेन प्रकल्पाची आखणी करताना बाधित होणाऱ्या शेतजमिनी, रहिवाशांचे पुनर्वसन, पर्यावरणाची होणारी हानी यासारखे महत्त्वाचे मुद्दे जनतेपुढे खुले केले जातील, असा दावा करत राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाने पारदर्शकतेचा आव आणला.  मात्र महामंडळाने प्रत्यक्षात मात्र पर्यावरण संस्था आणि ग्रामस्थांना अजूनही अंधारात ठेवल्याचे चित्र दिसत आहे.

या प्रकल्पाची आखणी करताना महामंडळाने तयार केलेल्या समाज सर्वेक्षण (सोशल इन्म्पॅक रिपोर्ट) तसेच पर्यावरण परीणाम अहवालावर (ईआयए) मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ात वेगवेगळ्या ठिकाणी जनसुनावणी घेण्यात आली. या सुनावणीसाठी जाहीर केलेल्या अहवालांची प्रत वेळेवर उपलब्ध करण्यात होत नसल्याच्या तक्रारी त्यावेळी पुढे आल्या होत्या. असे असताना पर्यावरण संस्था आणि ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे महिनाभरात सादर केली जातील हा रेल्वे महामंडळाचा दावाही आता फोल ठरू लागला आहे. जनसुनावणी घेऊन तब्बल चार महिने उलटूनही महामंडळाच्या संकेतस्थळावर अद्याप अंतिम अहवाल जाहीर होत नसल्याने हा प्रकल्प अपारदर्शकतेच्या वाटेने निघाला असल्याच्या तक्रारी आता बाधित तसेच पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पात पर्यावरणाला हानी पोहचत असल्यामुळे यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा पर्यावरण परिणाम अहवालावर साधारण मे महिन्याच्या मध्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जनसुनावणी सुरू करण्यात आली. ही सुनावणी घेत असताना खरे तर पर्यावरण अहवालाचा सविस्तर मसुदा नागरिकांपर्यंत पोहचणे आवश्यक होते. मात्र, हा अहवाल नेमका कुठे आहे याचा थांगपत्ता सुनावणीचा दिवस तोंडावर येईपर्यंत अनेकांना लागत नव्हता. काही पर्यावरण संस्था आणि ग्रामस्थांच्या हाती हा अहवाल लागल्याने प्रत्यक्ष सुनावणीला अपेक्षित प्रतिसादही मिळाला नव्हता. त्यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकतेच्या केवळ गप्पा मारल्या जात असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या प्रकल्पात ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील अनेक गावे बाधित होणार आहेत. ठाणे तसेच आसपासची जंगले, डोंगर, खारफुटी क्षेत्र, पाणथळ जागांचा याचा ऱ्हास होणार आहे. जमिनीअंतर्गत बोगदे, पूल बांधून भराव घालण्यात येणार असून पर्यावरणाच्या दृष्टीने या प्रकल्पात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पर्यावरणप्रेमींचे प्रश्न काय होते?

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे ठाणे खाडीला धोका पोहचत नसल्याचा दावा भारतीय खारफुटी मंडळाकडून करण्यात येत असला तरी खाडीच्या अंतर्गत भागातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गामुळे जैवविविधतेचा होणारा ऱ्हास कसा रोखणार असे प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून विचारण्यात येत आहेत. ठाणे जिह्य़ातील आपल्या आसपासचे भूमिगत पाणीसाठे, त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची उपजीविका, शेतजमिनीचा कस, शेतीतील उत्पन्न या घटकांवर होणाऱ्या परिणामांच्या उपाययोजना या बैठकीत विचारण्यात आल्या होत्या. पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची प्रशासनाकडे ठोस उत्तरे नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे उपस्थित प्रश्नांची सविस्तर सर्वेक्षण करून एका महिन्यात उत्तरे संकेतस्थळावर नागरिकांच्या हरकती घेण्यासाठी जाहीर केली जातील, असे आश्वासन देऊन महामंडळाने वेळ मारून नेली होती. असे असले तरी या सुनावणीला तब्बल चार महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचा सुधारित अहवाल अद्याप संकेतस्थळावर जाहीर होत नसल्याने जनसुनावणीची प्रक्रिया दिखाऊपणासाठी होती का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच सुधारित अहवाल जाहीर नसल्याने याविषयी हरक ती, सूचना नोंदविण्याची प्रक्रियाही लांबणीवर पडत असल्याने एकूणच प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

बुलेट ट्रेनचा पर्यावरण परिणाम अहवाल (ईआयए)आणि समाज परिणाम अहवाल (एसआयए) याविषयी संबंधित यंत्रणेकडे सातत्याने विचारणा केली तरी अद्याप सर्वेक्षण सुरू आहे. लवकरात लवकर अहवाल सादर केला जाईल, असे सांगण्यात येत असल्याने संपूर्ण सर्वेक्षणाविषयी प्रकल्पाची आखणी केल्यास आमचा विरोध कायम राहील.   – अ‍ॅड. भारद्वाज चौधरी, आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ

बुलेट ट्रेनच्या संदर्भातील पर्यावरण संदर्भातील अहवाल तयार आहे. या संदर्भातील माहिती आमच्याकडे आलेली आहे. सध्या या माहितीचे संकलन सुरू आहे. काही दिवसांनी हा सविस्तर अहवाल संकेतस्थळावर सादर केला जाईल.    – धनंजय कुमार, प्रवक्ता- नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन

First Published on September 2, 2018 2:36 am

Web Title: high speed bullet train project