ग्रामीण रुग्णांना फायदा

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्य़ातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी जिल्हा सामान्य रुग्णालयावरचा करोनाबाधितांचा भार कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील रुग्णांची जवळच व्यवस्था करण्यासाठी भिवंडी तालुक्यातील सावद येथे ८१८ खाटांचे कोविड रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कल्याण शहराच्या वेशीवर असलेल्या या रुग्णालयाचा फायदा कल्याण, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ आणि मुरबाड या तालुक्यातील रुग्णांना होणार आहे. तसेच हे कोविड रुग्णालय कायमस्वरूपी ठेवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासाठी लागणारे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचारी यांची नेमणूकही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली. सध्या येथे शस्त्रक्रिया विभाग तयार केला जात असून लवकरच या रुग्णालयाचे लोकार्पण होईल.

सुविधा काय?

’ मुंबई-आग्रा महामार्गापासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेल्या या रुग्णालयात ८१८ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

’ त्यात प्राणवायूचा पुरवठा असलेल्या ३०० खाटा असणार आहेत.

’ २० खाटा व्हेंटिलेटरयुक्त तर ८० खाटा अतिदक्षता विभागासाठी राखीव आहेत.

’ या रुग्णालयात १८ हजार लिटर प्राणवायूच्या पुरवठय़ाची क्षमता आहे.

’ जिल्ह्य़ातली ही सर्वात मोठी प्राणवायू पुरवठा करणारी यंत्रणा ठरणार आहे.

’ सौम्य, मध्यम आणि गंभीर अशा सर्व रुग्णांवर येथे उपचार केले जातील.

अद्ययावत यंत्रणा

डॉक्टर आणि परिचारिकांना संसर्गापासून रोखण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात प्रयोगशाळा, अपंगांसाठी स्वच्छतागृह, मोबाइल डायलेसिस यंत्र, सीसीटीव्ही कॅमेरे, संगीत यंत्रणा, पर्यायी वीज व्यवस्था, दूरचित्रवाणी संच, वायफाय, बंदिस्त खेळ, रुग्णवाहिका अशी यंत्रणा उभारण्यात आली आहे.