माशांचे भाव गगनाला; ३०० ते ५०० रुपयांनी वाढ

भगवान मंडलिक; कल्याण</strong>

कडाक्याची थंडी आणि खोल समुद्रात वाहणारे जोरदार वारे टाळण्यासाठी मासेमार सध्या किनाऱ्यालगतच मासेमारी करू लागले आहेत. या भागात पुरेसे मासे जाळ्यात येत नसल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून सर्वच प्रकारच्या माशांचे भाव ३०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. कोकणपट्टी किनाऱ्यावरील उपाहारगृह चालकांना या तुटवडय़ाचा सर्वाधिक फटका बसत आहे. अनेक हॉटेल चालक मुंबई, अलिबाग, पनवेल परिसरातून मासळी खरेदी करत आहेत. त्यामुळे खवय्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

मासेमार रात्रभर खोल समुद्रात मासेमारी करून सकाळीच ताजे मासे धक्क्यावर आणतात. मुंबई, पनवेल, रेवस, मांडवा, अलिबाग आणि उर्वरित कोकण किनारपट्टी परिसरात सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे खोल समुद्रात न जाता किनारा परिसरातच मासेमारी केली जात आहे, मात्र या परिसरात मिळणाऱ्या माशांचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत फारच कमी आहे, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. पुरवठा खूप कमी झाल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती मासळी विक्रेत्यांनी दिली. हिवाळ्यात अनेकजण सहलीसाठी बाहेर पडतात. त्यांना मासे हवे असतात. अलिबागमधील अनेक हॉटेल, ढाबा, शेतघरचालक पहाटेपासून मुंबई, पनवेल परिसरातून मिळेल ती मासळी घेऊन जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली.

                   वाढलेले दर (रु./किलो)

* पापलेट            १५०० ते १८००

* सुरमई              १८०० ते २०००

* कोलंबी             १००० ते १२००

* हलवा               १००० ते १२००

*  रावस                ८०० ते १०००

*  पिवळी वाव        १२०० ते १५००

खोल समुद्रात मासे अधिक मिळतात, मात्र सध्या तिथे जोरदार वारे वाहत असल्याने मासेमारीत अडथळे येतात. धोका असतो. त्यामुळे त्या भागात जाण्याचे धाडस कोणी करत नाही. समुद्र किनारा भागात सध्या मासेमारी सुरू आहे. पण किनारा भागात फार मासे मिळत नाहीत. मासेमार सध्या थंडी कमी होण्याची वाट पाहत आहेत.

– किशाबा तांडेल, मच्छीमार, मांडवा 

१५ दिवसांपासून मासळीचा खूप तुटवडा आहे. ग्राहकांना मासळी नाही, असे सांगता येत नाही. त्यांच्यासाठी पनवेल, मुंबईपर्यंत जाऊन मासळी आणावी लागते.

– किशोर चौधरी, व्यवस्थापक, नागावची वाडी फार्म हाऊस, अलिबाग

मुंबईहून मासळी कमी प्रमाणात येत आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दर ३०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. ग्राहक मात्र नेहमीच्या दराने मागणी करतात.

– भाऊराव भोईर, मासळी विक्रेता, डोंबिवली