डोंगरावरून भिरकावलेला दगड लागून मुलगा जखमी

ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यावर सुरू असलेल्या वाहतुकीच्या अनागोंदीचा कारभार नित्याचा असताना या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना लुटण्याचे तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकारही येथे उघडकीस येऊ लागले आहेत. या मार्गावरून निघालेल्या एका कारवर अज्ञातांनी दगड भिरकावल्यामुळे झालेल्या अपघातात १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या मुलावर सध्या मुंबईतील शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुजरात येथे राहणारा मोहम्मद कोमरा (१०) हा त्याच्या कुटुंबीयांसह सुट्टी निमित्ताने मुंब्रा येथील त्याच्या नातेवाइकांकडे आला होता. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो कुटुंबीयासह मुंब्रा चौपाटी येथे फिरण्यासाठी कारने गेला होता. घरी परतत असताना मुंब्रा बायपासवर त्यांच्या कारच्या दिशेने एक मोठा दगड भिरकावण्यात आला. मोहम्मद कोमरा हा मागच्या सीटवर बसला होता. कारची काच उघडी असल्याने तो दगड थेट त्याच्या डोक्याला लागला. हा मार इतका जोरदार होता की डोक्यातील हाडालाही इजा झाली आहे. कारचालकाने मोहम्मदला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला शीव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हा प्रकार लूट किंवा चोरी करण्यासाठी झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर मुंब्रा बायपासवरील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत निमुळता असल्याने या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू असते. याचा फायदा घेत रात्रीच्या वेळेत चाकूचा धाक दाखवून येथे ट्रकचालकांना लुटल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या प्रकरणाच्या नोंदीही मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

लुटमारीच्या घटना

* एप्रिल २०१९ मध्ये मुंब्रा बायपासजवळून चाललेल्या एका व्यक्तीला लुटण्यात आले होते.

* नोव्हेंबर २०१८ मध्ये ट्रकचा पाच चोरटय़ांनी रिक्षामधून पाठलाग केला. त्यानंतर बळजबरीने तो ट्रक थांबविला आणि ट्रकचालक आणि त्याच्या साथीदाराला लुटले.

* मार्च २०१६ मध्ये ट्रकचालकांना लुटण्यासाठी घात लावून बसलेल्या पाच जणांना पोलिसांनी वेळीच अटक केली.

* जून २०१४ मध्ये ट्रकच्या दुरुस्तीसाठी थांबलेल्या वाहनचालकाला तीन जणांनी लुटले होते.

आम्ही गुजरातहून नातेवाईकांच्या घरी आलो होतो. घडलेल्या प्रकारानंतर मनात भीती निर्माण झाली आहे. मोहम्मदवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.

– मोहम्मदचे वडील