किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : गेल्या आठवडय़ाभरापासून सतत इंधन दरवाढ होऊ लागल्याने त्याचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिक आणि मालवाहतूकदार व्यावसायिकांना बसू लागला आहे. डिझेलचे दर वाढत असल्याने मालवाहतूकदारांना एका फेरीमागे ६०० ते २००० रुपये अधिक मोजावे लागत आहे. तर, रेल्वेच्या लोकलगाडय़ांमध्ये अद्याप प्रवासाची मुभा नसल्याने स्वत:च्या खासगी वाहनाने घर ते कार्यालयापर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही इंधनदरवाढीचा फटका बसला असून त्यांचा इंधन खर्च दरदिवशी २० ते १५० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली होती. या टाळेबंदीच्या काळात अनेकजण बेरोजगार झाले तर अनेकांच्या पगारात कपात झाली. तसेच उद्योग आणि दुकाने बंद असल्याने व्यापारी आणि उद्योजकांनाही टाळेबंदीचा फटका बसला. अनेकजण आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच आता टाळेबंदीनंतर त्यांच्यापुढे इंधन दरवाढीचे संकट उभे राहिले आहे. इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होऊ लागली आहे. त्याचा फटका सर्वानाच बसू लागला आहे. मंगळवारी मुंबई-ठाण्यात डिझेलचे दर हे ७८.९७ रुपये तर पेट्रोलचे दर ८९.०२ रुपये झाले. करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे ठाणे शहरापल्ल्याड राहणारे आणि मुंबईतील खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला स्वत:च्या खासगी वाहनाने घर ते कार्यालयापर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. परंतु इंधनदरवाढीमुळे दुचाकीने ठाणे किंवा मुंबई प्रवास करणाऱ्यांना २० ते ५० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. तर कारने प्रवास करणाऱ्यांना १०० ते १५० रुपये अधिकचे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पुन्हा कोलमडू लागल्याचे चित्र आहे. मालवाहतूकदारांनाही या इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. मालवाहतूकदारांना वाहतुकीसाठी ५०० ते २००० रुपये अधिक खर्च करावे लागत आहेत. आधीच वस्तू आणि सेवा करामुळे संकटात असतानाच आता इंधन दरवाढीमुळे आणखी संकटात सापडू लागल्याची प्रतिक्रिया मालवाहतूकदार व्यक्त करत आहेत.

मालवाहतूकदारांना येणारा खर्च

उरण जेएनपीटीहून दिवासाला १० हजार अवजड वाहने राज्यातील विविध जिल्ह्य़ात आणि देशभरातील विविध राज्यात जात असतात. जेएनपीटी येथून भिवंडीत येण्यासाठी मालवाहतूकदारांना सध्या एका फेरीसाठी ४८०० रुपये फक्त इंधनासाठी मोजावे लागतात. १० दिवसांपूर्वी हा खर्च ४२०० रुपये इतका येत होता. तर, गुजरात, कर्नाटक, गोवा येथे जाण्यासाठी ११ ते १५ हजार रुपयांचे इंधन लागत होते, त्यात आता आठशे ते दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मालवाहतूकदार संकटात आहे. अनेकांनी तर आता हा व्यवसायच सोडून दिला आहे. त्यात आता करोनाच्या काळात इंधन दरवाढ झालेली आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असलेला मालवाहतूकदार आता आर्थिक संकटात सापडला आहे.
– सुरेश पानमंद, सचिव, महाराष्ट्र अवजड वाहने आणि आंतरराज्य कंटेनर चालक संघटना

टिटवाळ्यात राहत असल्याने मुंबई-ठाण्यात अनेक महत्त्वाच्या बैठकांसाठी जावे लागत असते. उपनगरी सेवा बंद असल्याने सध्या कारने ये-जा करावी लागते. १५ दिवसांपूर्वीपेक्षा इंधनाच्या दरात १०० ते १५० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम येत्या काही दिवसांत सर्वच क्षेत्रात जाणवणार आहे.
– स्वप्नील दाभाडे, संचालक, होरायझन टेक्नॉलॉजी