ठाण्यातील ‘हिलग्रेंज’ सोसायटी पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण
उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यावर महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा हळूहळू कमी होऊ लागतो. त्यामुळे टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ अनेकांवर येते. मात्र टँकरचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध नसल्याने मग बाटलीबंद पाणी वापरावे लागते. त्यासाठी महिन्याकाठी हजारो रुपये खर्च होतात. शहरातील अनेक सोसायटय़ांना सध्या दुधापेक्षा पाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. ठाण्यातील ‘हिलग्रेंज’ सोसायटीमध्ये वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. शहरामध्ये आठवडय़ातून तीन दिवस पाणीपुरवठा होत नसताना या सोसायटीमध्ये नियमित पाणी उपलब्ध राहते. केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही या सोसायटीला महापालिकेकडून पाण्याच्या एका थेंबाचीही गरज लागत नाही. सोसायटीने उभारलेली जलशुद्धीकरण प्रणाली आणि पर्जन्य जलवापर यंत्रणेच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात पाणी बचत होत असून त्याचा येथील रहिवाशांना फायदा होत आहे. विशेष म्हणजे वातानुकूलित यंत्रणातील प्रत्येक थेंबन्थेंब पाण्याचा वापरही या संकुलामध्ये केला जात आहे, त्यामुळे वाहने स्वच्छ करण्यासाठी तसेच उद्यानातील वनस्पतींसाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा करणे शक्य होऊ लागले आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये २००३ मध्ये हिलग्रेंज इमारत बांधण्यात आली. २००३ मध्ये येथे रहिवासी राहायला येऊ लागले. मात्र महापालिकेकडून येथे पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. त्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. अर्थातच नागरिकांना त्याचा खूप त्रास होत होता. २००५ मध्ये या परिस्थितीवर मात करण्याचा निश्चय रहिवाशांनी केला. त्यांनी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे प्रयत्न सुरू केले. २०० कुटुंबांच्या या संकुलास दिवसाला सुमारे १ लाख ६० हजार लिटर पाणी लागते. तितके पाणी उपलब्ध झाले की त्यांना महापालिकेच्या पाणीपुरवठय़ावर अवलंबून राहावे लागणार नव्हते. पाण्याचा पर्यायी स्रोत शोधण्यासाठी त्यांनी इमारतीच्या परिसरामध्ये कूपनलिका खोदण्याची कामे सुरू झाली. मात्र केवळ एक कूपनलिका पुरेशी नव्हती. त्यामुळे पुढे आणखी तीन कूपनलिका खणून पाण्याचा पुरवठा वाढवण्यात आला. मात्र जमिनीतून येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने या मंडळींनी हे पाणी पिण्यायोग्य होण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आणि इमारतीच्या गच्चीवर जलशुद्धीकरण यंत्रणा उभी राहिली. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य बनवण्यात आले असून आता दर महिन्याला पाण्याची गुणवत्ता तपासून त्याचा वापर केला जातो. कूपनलिकेच्या माध्यमातून जमिनीतील पाणी काढले जात असल्याने पाण्याची पातळी कमी होणार हे ओळखून सोसायटीने इमारतीवर पडणारे सर्व पर्जन्य जल एकत्र करून ते पुन्हा कूपनलिकेत साठवण्यास सुरुवात केली. सध्या कूपनलिकेमध्ये येणारे पाणी शुद्धीकरण करून सोसायटीमध्ये पिण्यासाठी वापरले जाते. महापालिकेकडून येणारे पाणी घरामध्ये स्वयंपाक आणि पिण्यासाठीही वापरले जाते. याशिवाय जलशुद्धीकरण यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी इमारतीखालील वेगळ्या टाकीमध्ये साठवून ते पाणी गाडय़ा धुण्यासाठी वापरले जाते. परिसरातील उद्यानालाही हेच पाणी पुरवले जाते. २००५ पासून २०११ पर्यंत सोसायटीच्या सदस्यांनी ही यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर आता या सोसायटीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होऊ लागले असून सोसायटी पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनली आहे.

‘ए.सी.’तून थंड हवेसोबत पाणी
पर्जन्य जलसंचय, कूपनलिका आणि जलशुद्धीकरण केंद्र याशिवाय अन्य पर्यायांच्या शोधात असणाऱ्या या सोसायटीच्या सदस्यांचे लक्ष वातानुकूलित यंत्रणेकडे गेले. संकुलातील २०० कुटुंबांपैकी ४० घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा असून त्यातून पडणारे पाणी पाइपच्या माध्यमातून एकत्र साठवले जाते. हे पाणी वाहने धुण्यासाठी, उद्यानातील झाडांना घालण्यासाठी वापरले जाते. दिवसाला एका वातानुकूलित यंत्रामधून १० ते १२ लिटर पाण्याची गळती होते. या गळतीमुळे पूर्वी चिखल, घाणीचा त्रास होत होता, मात्र आता तो त्रास गेलाच, शिवाय अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले होते. हेच पाणी नागरिकांना उपयुक्त ठरू लागले आहे. पुढील काळात इमारतीबरोबरच सोसायटी परिसरातील मैदानावरील पाणीही जमिनीमध्ये मुरावे यादृष्टीने प्रयत्न केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे कूपनलिकेची पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यात यश मिळू शकणार आहे. या सोसायटीमध्ये पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पावसाळ्यात हे नागरिक महापालिकेच्या पाण्याचा वापर करणे पूर्णपणे टाळतात. संकुलात मुबलक पाणी असले तरी शहरातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन येथील रहिवाशांनीही पाणी जपून वापरण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठय़ाबाबत स्वयंपूर्ण होण्यात उपसंचालक सुनील हडकर यांनी विशेष प्रयत्न केले असून सोसायटीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी विशेष मदत केली. त्यामध्ये श्रीनिवासन, रमेशचंद्र, थॉमस जेकब अशा मंडळींचा समावेश आहे.