रिजन्सी इस्टेटमागच्या डोंगररांगा, डोंबिवली (पूर्व)

शहरात बाकी सारी भौतिक सुखे हात जोडून उभी असतात, मात्र काँक्रीटच्या या जंगलात निसर्गसौंदर्य दुर्मीळ झालेले असते. डोंबिवली शहरही त्याला अपवाद नाही. मात्र तरीही या शहराच्या वेशीवर काही ठिकाणी अजूनही जुन्या निसर्गश्रीमंतीच्या खुणा शिल्लक आहेत. पूर्व विभागातील रिजन्सी इस्टेटच्या मागील डोंगररांगा त्यांपैकी एक. इथे सकाळच्या मोकळ्या हवेत वनराईच्या सान्निध्यात मातीचा रस्ता तुडवीत निसर्गाचा आस्वाद घेता येतो. पक्ष्यांच्या किलबिलाटात, रानफुलांच्या दुलईमधून पायवाट काढीत उगवत्या सूर्याची पहिली किरणे अंगावर झेलत दिवसाची सुरुवात करता येते.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…

डोंबिवली शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर रिजन्सी इस्टेट हा परिसर आहे. याच परिसरातून वाट काढीत तुम्हाला या डोंगररांगा गाठता येतील. सुरुवातीला सिमेंटच्या पक्क्या रस्त्याची चढण पार केल्यानंतर तुम्ही या डोंगररांगांच्या कुशीत शिरता. सकाळच्या मंद प्रकाशात, प्रसन्न वातावरणात तीन-चार डोंगर सुरुवातीलाच तुमच्या नजरेचे पारणे फेडतात. पावसामुळे डोंगरांवर पसरलेली हिरवाई, त्यावर सूर्याची पडणारी किरणे मन मोहून घेतात. येथील नैसर्गिक गवतावर तसेच मातीवर चालण्याचा आनंद अवर्णनीय असतो. डॉ. मिलिंद शिरोडकर येथे गेली अनेक वर्षे येत आहेत. सुरुवातीच्या काळात फिरायला येणाऱ्या या निसर्गप्रेमी मंडळींनी आपल्या सोयीसाठी येथे काही पायवाटा तयार केल्या. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा येथे राबता वाढू लागला. नागरिकांच्या सोयीसाठी एका डोंगरावर लोकांनीच वर्गणी काढून बसण्यासाठी शेड व चौथरा बनविला. मग त्या ठिकाणी लोक व्यायाम करू लागले. काही जण संध्याकाळच्या वेळी येऊन बसू लागले. नागरिकांच्या या वहिवाटीला वन विभागाने विरोध केला. मात्र चर्चेअंती त्यातून मार्ग निघाला. वन विभागाचा विरोध मावळला. त्यांनी नागरिकांच्या फिरण्यास हरकत घेण्याचा नाद सोडला. खरे तर नागरिकांच्या नियमित वर्दळीमुळेच वन विभागाची जागा अतिक्रमणापासून वाचली. अन्यथा वाळूमाफियांनी हे डोंगर कधीच पोखरून नेले असते, असे सांगितले जाते.

या डोंगरावर एक शंकराचे मंदिर आहे. शिवाय एक गायमुख कुंडही आहे. या कुंडामध्ये बाराही महिने पाणी असते. या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये सगळीकडे पाणीटंचाईच्या झळा बसल्या होत्या. डोंगरावरील छोटे छोटे झरेही आटले होते, मात्र हे कुंड पाण्याने भरलेले होते, असे प्रेमा म्हात्रे यांनी सांगितले. या भागातून सूर्य उगवताना व मावळतानाचे दृश्य खूप सुंदर दिसते. त्यामुळे सकाळ-संध्याकाळी खास नागरिक हे पाहण्यासाठी येथे येतात. त्यांना बसण्यासाठी योग्य आसन व्यवस्था असायला हवी. तसेच काही पायवाटा निसरडय़ा झाल्या आहेत. त्या दुरुस्त कराव्यात. दगडाच्या पायवाटा किंवा मातीचाच रस्ता करावा. मात्र वन विभागाने त्याची देखभाल-दुरुस्ती करावी, असे शीला शरद माने यांनी सांगितले. येथे येणाऱ्या महिलांचा एक गट तयार झाला असून या डोंगररांगांच्या कुशीत आमची डब्बा पार्टीही होते. मात्र निसर्गाला कुठेही धक्का बसणार नाही, परिसर अस्वच्छ होणार नाही, याची काळजी आम्ही घेतो, अशी माहिती माधवी चव्हाण व करुणा गोरे यांनी दिली.

भाल, उंबार्ली, दावडी, सोनारपाडा या गावांच्या महसूल हद्दीत या डोंगररांगा येत असून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि नव्याने उभी राहत असलेली पलावा सिटी याच्या नेमक्या मध्यभागी हा जेमतेम तीन-साडेतीन एकरचा निसर्गाचा पट्टा शाबूत आहे. याच्या मागच्या बाजूला नेवाळी विमानतळाची जागा आहे. ठाण्यातील येऊरच्या धर्तीवर या परिसराचा वन विभागाने विकास केल्यास डोंबिवलीकरांना एक चांगले पर्यटनस्थळ मिळू शकेल, असे मत येथे नियमित फिरायला येणारे नागरिक प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

आरोग्यदायी

शहरातील आजारी व्यक्तींचे पारंपरिक पद्धतीने नाडीपरीक्षण करणारे अनेक डॉक्टर या भागात मॉर्निग वॉकसाठी येतात. येथील प्रसन्न वातावरण, स्वच्छ हवा आणि निसर्ग शहरात इतर कुठेही सापडणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही सायकलपटूंची टीमही या डोंगररांगामध्ये सकाळच्या वेळी सराव तसेच व्यायामासाठी येते.

बंधाऱ्यांमुळे जलसंवर्धन

वन विभागाने डोंगरावरील पाणी अडविण्यासाठी येथे तीन बंधारे बांधले आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने डोंगरावर मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा झाला असून याचा फायदा आजूबाजूच्या गावांना होणार आहे. गावातील अनेक ग्रामस्थांची या भागात शेती असून ते येथे लहानसहान पिके घेतात.

वाढत्या काँक्रीटीकरणाचे फास

डोंबिवलीलगतच्या ग्रामीण भागांचे झपाटय़ाने नागरीकरण होऊ लागले आहे. त्यासाठी डोंगर, टेकडय़ा फोडल्या जात आहेत. विकासक त्याजागी टोलेजंग इमारती उभारत आहेत. काँक्रीटचे हे अतिक्रमण आता या जागेच्या वेशीपर्यंत आले आहे. त्यासाठी तातडीने संवर्धन आवश्यक आहे.

मद्यपींचा उपद्रव

या भागात मद्यपींचा उपद्रव वाढत आहे. या डोंगररांगेची सुरुवात होते, तिथेच एक खासगी ढाबा आहे. तिथे नागरिक पार्टी करण्यासाठी येतात; परंतु ते वनराई परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या इतरत्र टाकून परिसर अस्वच्छ करतात.

पशुपक्ष्यांचा निवारा

येथे नागरिकांची जास्त वर्दळ नसल्याने या भागातील निसर्गसंपदा अद्याप टिकून असल्याचे मत काही नागरिक व्यक्त करतात. विविध प्रकारचे पक्षी येथे ऋतुमानानुसार पाहायला मिळतात. वन विभागाने या भागात नव्याने लागवड केली असून त्यांची योग्य देखभाल घेतल्यास येथे काही वर्षांतच घनदाट जंगल पाहायला मिळेल. त्यामुळे जंगलातील पशु-पक्ष्यांना एक हक्काचा निवारा मिळेल. या डोंगराचे एक वैशिष्टय़ म्हणजे पावसाळ्यात या भागात असंख्य गांडूळ तुम्हाला पायवाटेवर दिसतात. त्यामुळे या डोंगराची जमीन ही भुसभुशीत राहून झाडांची योग्य वाढ होऊ शकते.

निसर्गाचा हा तुकडा जपावा

विकास म्हणजे काँक्रीटीकरण असे समीकरण असेल तर हा भाग असाच अविकसित राहावा, असे मला वाटते. मद्यपी लोकांचा मात्र बंदोबस्त करायला हवा. पहाटेच्या वेळी येथे प्रसन्न वाटते. निसर्गाचा हा तुकडा जपायला हवा, असे मला वाटते.

डॉ. मिलिंद शिरोडकर

 

दिवसाची छान सुरुवात

डोंबिवलीतील निवासी विभागात आम्ही राहतो; परंतु गजबजलेल्या या शहरात असा मोकळा भाग कुठेही नाही. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात दिवसाची सुरुवात व्हावी, म्हणून आम्ही सकाळीच इतक्या लांबवर येतो. येथील रानवाटा तुडविल्या की ताजेतवाने होतो.

हर्षांली चौधरी

 

सुरक्षारक्षक हवा

शहरात शोधूनही अशी जागा तुम्हाला सापडणार नाही. येथे आल्यावर जंगलाची छोटीशी सफर केल्याचा आनंद मिळतो. येथे आल्यावर काही नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी हा परिसर अस्वच्छ करतात, प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या येथेच टाकतात. त्यांना आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात यावी.

महेंद्र हंसराजपाल