स्वागतयात्रेनिमित्त व्याख्यान, गाण्याची मैफल; भव्य स्वागतयात्रांनी बदलापूर गजबजणार

दर वर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवस नववर्षांच्या स्वागताच्या कार्यक्रमांचे आयोजन बदलापुरात करण्यात आले आहे. शुक्रवार, शनिवार व्याख्यान आणि सुमधुर गायनाच्या कार्यक्रमांच्या आयोजनासह गुढी पाडव्याच्या दिवशी भव्य शोभायात्रा निघणार आहे.

कुळगाव बदलापूर शहरातील नववर्ष स्वागतयात्रेचे आगळेवेगळे आयोजन यंदाही करण्यात आले आहे. श्री हनुमान मारुती मंदिर ट्रस्ट आणि नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांची मेजवानी असे स्वरूप दर वर्षी ठेवण्यात येते. त्यानुसार यंदा शुक्रवारी सायंकाळी गांधीचौकातील हनुमान मारुती मंदिरात सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आठवणीतले बाबूजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शनिवारी गीता उपासनी यांचे अध्यात्मवादी सावरकर या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.

या व्याख्यानानंतर गांधी चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य स्वागतयात्रा निघेल. त्याची सुरुवात पश्चिमेतील दत्त चौकातून होईल.

पुढे गणेश चौक, मांजर्ली, सर्वोदय नगर, रेल्वे स्थानकातून उड्डाणपूलामार्गे स्वागतयात्रा पूर्वेत प्रवेश करेल. पुढे कुळगाव सोसायटी, शिवाजी चौक, गोळेवाडीमार्गे स्वागतयात्रा गांधी चौकात पोहोचेल.

तर कात्रप, हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, शिरगाव, कुळगाव आणि शिवाजी चौक येथून येणाऱ्या उपयात्राही मुख्य स्वागतयात्रेत सहभागी होतील. बदलापुरातील शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती मीनल भोईर हिला यंदाचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

तर या वेळी भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तरी अधिकाधिक संख्येने या स्वागतयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.