हिरानंदानी आणि अ‍ॅथलेटिक्स फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ फेब्रुवारीला अर्थ मॅरेथान स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा ‘मी धावणार नव्या आयुष्यासाठी..’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. वेगवेगळ्या चार गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेच्या प्रवेश शुल्कामधून जमा होणारा निधी सामाजिक संस्थेला देण्यात येणार आहे, अशी माहिती हिरानंदानी ग्रुपच्या रितिका शहा यांनी दिली.

घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट परिसरातच ही स्पर्धा होणार असून यंदा स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेत दरवर्षी तरुणांसह ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होतात. गेल्या दोन वर्षांत मॅरेथॉन स्पर्धेच्या प्रवेश शुल्कातून मिळालेला निधी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्यात आला. यंदाची स्पर्धा ‘मी धावणार नव्या आयुष्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे. २१ किमी, १० किमी, ४ किमी आणि ३ किमी अशा चार गटांत ही स्पर्धा होणार असून २१ किमी खुल्या गटातील पुरुष आणि महिला स्पर्धकांसाठी असणार आहे. १० किमी महिलांसाठी, तर ३ व ४ किमी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. या कार्यक्रमास हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, ठाण्याचे महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित राहणार आहेत. ठाण्यातील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेस उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन हिरानंदनी ग्रुपच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.