मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून ऐतिहासिक ठेव्याचा अभ्यास
शिलाहारांची राजधानी असलेल्या ठाणे शहरातील शिलाहारकालीन वास्तूंचा ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या वास्तू आणि मूर्तीची दुरवस्था झाली असून मोकळ्या मैदांनावर, रस्त्याच्या कडेला, उपाहारगृहाच्या दर्शनी भागात, मंदिराच्या परिसरात आणि तलावांच्या काठावर अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत हा ठेवा धूळ खात पडला आहे. काही ठिकाणी इमारतीच्या सुशोभीकरणासाठी त्याचा वापर करण्यात आल्याचे धक्कादायक पुरावे सापडले आहेत. तर काही मंदिरांमध्ये या ऐतिहासिक मूर्ती आणि वस्तूंना रंगरंगोटी करून त्याचे विद्रूपीकरण करण्यात आल्याचा प्रकार घडत आहे. मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी ठाणे शहरातील पुरातन वस्तूंच्या अभ्यासादरम्यान हा प्रकार उघडकीस आणला आहे. ठाणे परिसरात आठव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत शिलाहारांचा अंमल होता. शिलाहारांच्या वैशिष्टय़पूर्ण सांस्कृतीचा हा परिसर साक्षीदार असून अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, वास्तू आणि वस्तू या काळाच्या आठवणी आजच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहे. मुंबई विद्यापीठाच्या पुरातत्त्व विषयाच्या अभ्यासक विद्यार्थ्यांनी ठाणे शहराच्या ऐतिहासिक वास्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागाचे संचालक सूरज पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले.
साहाय्यक प्राध्यापक कुरूश दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली अभिरुची ओक, अनुजा पटवर्धन आणि विशाखा कुलकर्णी यांनी ठाणे शहराचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळी या विद्यार्थ्यांनी ठाण्यातील मंदिरे आणि तलावांचा अभ्यास सुरू केला. त्या वेळी शहरातील ३४ ठिकाणांवर अत्यंत पुरातन काळातील वस्तू, मूर्ती आणि दगडी वस्तू सापडल्या. यामध्ये ठाण्यातील पोलीस वसाहत आणि काही खासगी इमारतींचाही समावेश आहे. ठाण्यातील कोकण इतिहास परिषदेचे अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांनी या उपक्रमाला मदत केली.

कौपिनेश्वर मंदिर
कौपिनेश्वर मंदिराच्या इमारतीत अनेक ठिकाणी पुरातन वस्तूंचा ठेवा दिसून येतो. या भागात मंदिराबाहेर बसवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एक बाकडय़ाखाली ऐतिहासिक शिलाहारकालीन खांबाचा भाग दिसून येतो. तर या भागातील एका उपाहारगृहामध्ये जुन्या मंदिराचा शिखर-कुट आढळून येतो. शिलहारकालीन मंदिराच्या खांबाचे तुकडेही येथे पाहायला मिळतात.

ठाणे शहरामध्ये अनेक प्राचीन वस्तू आणि मूर्ती आढळत असून त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये हे वैभव पडले असून त्याला चांगले जतन करण्याची गरज आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या गोष्टींचा आभ्यास केला असून यापेक्षाही अधिक प्राचीन वस्तू या भागात असून हे विद्यार्थी पुढील काही काळात त्यावर संशोधन करणार आहे.
– प्रा. कुरूष दलाल, पुरातत्तव संशोधक, सहसंचालक

ठाण्यातील गावदेवी मंदिर
ठाण्यातील गावदेवी मंदिर हे नव्याने जीर्णोद्धार झालेले मंदिर असले तरी मंदिराच्या काही भागात शिलाहारकालीन दगडांचा समावेश करण्यात आला आहे. या भागात शिलाहारकालीन कुटशिखर सापडली असून त्यांना देवीच्या बाजूला स्थान देऊन त्याची पूजा केली जात आहे.

घंटाळी मंदिर

घंटाळी मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजाचा खालील भागात असलेला दगड हा शिलाहारकालीन मंदिराचा भाग आहे. मंदिराच्या गर्भगृहातील हे एकमेव मंदिराचे पुरातन दगड आहे.
पोलीस लाइन : संगमरवराचे कोरीवकाम असेल्या १२व्या शतकातील जैन मंदिराच्या छताचा खांब इथे सापडला आहे. दोन किचके, एक मूर्तीचे शिर आणि दुसऱ्या मूर्तीचे धड इथे सापडले आहे.
सिद्धेश्वर मंदिर : सिद्धेशवर मंदिर परिसरामध्ये दोन सुंदर ब्रह्ममूर्तीच्या बाजूला तीन विष्णुमूर्ती अत्यंत दुरवस्थेत पडलेल्या आहेत.