तीनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या तोफांना कापूरबावडी येथील कलादालनात ठेवण्यात आले आहे. कोपरीतील विसर्जन घाटावर उलट्या गाडून ठेवलेल्या या तोफा कलादालनात आणल्यानंतर त्या आता मोकळा श्वास घेतील असे इतिहास प्रेमींना वाटत आहे.  निसर्गाचे वरदान मिळालेल्या ठाणे शहराला इतिहासाची वेगळी पार्श्वभूमी आहे. मेट्रोपोलिटीन सिटी म्हणून ओळखू पाहणाऱ्या ठाण्यात ऐतिहासिक गोष्टींच्या खाणाखुणा आजही आढळून येतात. शहराच्या मध्यवर्ती भागातील सेंट्रल जेल हा पुर्वीचा भूईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध होता. इंग्रजांच्या अगोदर भारतात प्रवेश करणाऱ्या पोर्तुगिजांनी समुद्र किना-यांचे महत्व ओळखून काही भूईकोट किल्ले बांधले असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी हा भूईकोट किल्ला.

आज ठाणे खाडीचे पात्र फारच आकुंचन पावले असले तरी पूर्वी खाडीची किनारपट्टी समुद्रासारखीच होती. १६ व्या शतकात पोर्तुगिज आणि अरेबियन लोक या बंदराचा व्यापारासाठी वापर करीत होते. ठाणे बंदरातून पडावातून मालवाहतूक व्हायची. त्यामुळे ठाण्याचे महत्व ओळखून या ठिकाणी १७३० ते १७३७ या काळात हा पोर्तुगिजांनी किल्ला बांधला असल्याची माहिती इतिहासात आहे. दरम्यानच्या काळात हा किल्ला अर्धवट स्थिती मध्ये असताना पोर्तुगिजांकडून मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. किल्ल्याच्या सुरक्षेसाठी तब्बल ४० तोफा तैनात ठेवल्या होत्या. बंदर असल्यामुळे जलमार्गाने शत्रूला रोखण्यासाठी तोफांचा वापर करायचा होता. परंतु मराठे शाहीत या तोफांचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे तोफा किल्यात पडून होत्या. ब्रिटिशांच्या राजवटीत डोंगर द-यांमधील युद्ध मागे पडून मैदानी युद्ध मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. किल्लाच्या सुरक्षे साठी आणण्यात आलेल्या या तोफा अखेर बंदरांवर ठेवण्यात आल्या. पुढे या तोफांचा उपयोग जहाजे बांधण्यासाठी आला असल्याचे स्थानिक सांगतात.

विसर्जन घाट हा कोपरीकरांसाठी चौपाटीचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथील सुर्योदय आणि खाडीत येणारे विविध पक्षी बघण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. परंतु या पर्यटकांना आणखी एक जागा खुणावते, म्हणजे इथे जमिनीमध्ये उलट्या गाडून ठेवलेल्या तोफा. बंदरावर एकूण १९ तोफा होत्या मात्र त्यापैकी ५ तोफा खाडीतील चिखलात रुतल्या असून आता अवघ्या १४ तोफा दिसतात. एका तोफेची उंची सुमारे ७ ते ८ फूट उंच आहे. २० वर्षांपूर्वी या तोफा सहज ओळखता येत होत्या. पण आता या तोफा जमिनीत खुप आत रुतल्या असून, त्या स्पष्टपणे ओळखता येत नाहीत. या ऐतिहासिक तोफा जतन करुन या तोफांचा इतिहास लिहून ठेवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची होती. याला महापालिकेने सकारात्मक विचार करुन या तोफांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरी विसर्जन घाटावरील दोन तोफा काढण्यात आल्या आहेत. या तोफा आता कापुरबावडी येथील कलादालनात ठेवण्यात आल्या आहेत.