News Flash

ख्रिस्तायण : इतिहासजमा झालेली गृहरचना

बैठकीसाठी बलकाव, फलाटी, माची, झोपाळा अशी बैठकीची व्यवस्था करीत त्यास ओटुली असे म्हणत.

परिसर, वातावरण आणि माणसाची गरज यांतूनच घरे निर्माण होतात, याच रचनेला गृहरचना असे म्हणतात. उत्तर कोकणातील वसई भागात ख्रिस्ती समाजाच्या गृहरचनांच्या शैलीविषयी या लेखात जाणून घेऊ या.

सामवेदी (कुपारी) समाजातील गृहरचना

ही घरे आळी आळीत बांधलेली असतात. या भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे तीन ते चार फुटांचा पाया (जोत) बनवून त्यावर घर बांधले जाते, तसेच घरावर मातीच्या कौलांचे छप्पर वापरत जे कोकणातील घरांचे वैशिष्टय़ आहे. ही घरे दगड आणि चुन्यापासून बनवली जात होती.

घरासमोर मोकळे अंगण, घरात शिरण्यासाठी दगडाच्या पायऱ्या, २ ते ३ फुटांवर पोटओटा ज्यास गय, असेही म्हटले जाते. नंतर वर चढले की एक प्रशस्त ९ ते १० फुट रुंद ओटा असे. या ओटय़ाचा वापर दिवाणखान्याप्रमाणे होत असे. बैठकीसाठी बलकाव, फलाटी, माची, झोपाळा अशी बैठकीची व्यवस्था करीत त्यास ओटुली असे म्हणत. हे घराच्या लांबीएवढे मोठे असल्यामुळे या भागाचा अनेक गोष्टींसाठी वापर करीत असे. शाल्डन रॉड्रिग्ज सांगतात की, ‘या ओटीवर दर्शनी भागात कोरीव काम केलेली लाकडी चौकट असे आणि त्यावर घर कधी बांधले त्याची तारीख कोरलेली असे.’ घराचे मुख्य प्रवेशद्वार मजबूत, जाड लाकडी फळीपासून बनवत असत. त्यावर नक्षीकाम केलेले असे, पितळेचा कडी-कोयंडा लावलेला असे, दरवाजावरील चौकटीच्या मध्यभागी क्रूस, द्राक्षे कोरलेली असे. त्याच्या बाजूला धार्मिक चित्र लावलेली असत. घरातील ओसरीमध्ये घरट, जाते ठेवलेले असे. तिथे दळणकाम केले जात असे, ही जागा लग्नकार्यासाठी उपयोगी पडे. तेथूनच एक लाकडी जिना पोटमाळ्याकडे जाण्यासाठी असे. तिथे बी-बियाणे, चिंच, तांदूळ इत्यादी साठवून ठेवले जाई. ओसरीच्या दोन्ही बाजूंची जागा झोपण्यासाठी वापरीत. ओसरीतून पुढे गेले की स्वयंपाकघर तिथे कमी उंचीची बैठक बनवलेली असे त्यास चुलवर म्हणत. त्यावर संयुक्त चुलींची रचना केलेली असे. लाकडी मोखर बनवलेले, असे ज्यावर स्वयंपाकाची भांडी ठेवलेली असत. घराच्या परसात पसरट काळा दगड असे तेथे कपडे, भांडी धुतली जात. त्याच भागात न्हाणीघर असे. घराजवळच्या पडवीत गोठा बांधत तसेच तेथे जण्यासाठी घरातूनदेखील दरवाजा ठेवला जाई. शेतीचे सामान, चारा, जळाऊ  लाकडे ठेवण्यासाठी घराजवळ बेडे बनवलेले असे.’

सध्या वसईत मात्र बंगलेच बंगले पाहायला मिळतात. स्लॅब, लोड बेअरिंगने बनवण्यात येतात. दगडी पाय वापरतात, मँग्लोरियन कौले वापरतात. आठ-नऊ खोल्यांचे घर जाऊन संयुक्त कुटुंबांमुळे छोटी घरे झाली.

ख्रिस्ती कोळी समाजातील गृहरचना :

व्यवसायानुरूप घरांची रचना बदलत जाते. व्यवसायानुसार या समाजाचे राहणीमान आणि त्यानुसारच त्यांच्या घरांची रचना बनवलेली आहे. दीपक माठक सांगतात की, ‘पूर्वी समाजाची दोन घरे असत. दोन्ही घरे ही एकमेकांच्या समोरच असत. एक घर जे जेवण बनवण्यासाठी, मासळी ठेवण्यासाठी, जळाऊ  लाकडे ठेवण्यासाठी असे. त्यास खोपट असे म्हटले जाई.’ याच घरात जेवण केले जात असे. येथेच बोटीवर जाणाऱ्यांसाठी रोटय़ा (भाकरीचा प्रकार) बनवल्या जात असे.

सारवलेले कुडाचे बांबू, झावळ्या, कौले यांपासून घर बनवलेले असे. स्वयंपाकघराला लांदपाची खोली म्हणतात. म्हणून समोरच्या घराला लांदपाचे खोपट असे संबोधले जात होते. दिवाणखान्याला ओठाण असे म्हटले जात होते. घरासमोर ओटा असे. तेथे निवांत बसणे, मासे सुकवणे, सुक्या माशांचे काम करणे इत्यादींसाठी तो ओटा महत्त्वाचा होता. घरात लाकडाचा माज म्हणजेच पोटमाळा बनवलेला असे. तिथे मासेमारीचे सर्व सामान ठेवण्यात येई. किमान चार खोल्यांचे घर असे. झोपण्याच्या खोलीला निजाची खोली असे म्हणत. एका खोलीत मोठी लाकडी कपाटे, लोखंडी तिजोऱ्या ठेवलेल्या असे. घराच्या पाठीमागे चिखल चढवून जागा कठीण बनवून खळी बनवली जात असे, जेथे मासे सुकवण्यासाठी ठेवले जात असत. घराच्या मागील बाजूस झावळ्या लावलेले न्हाणीघर असे, ज्यास वारवल असे म्हणत.

या समाजाची जास्तीत जास्त घरे ही किनाऱ्याजवळ बांधलेली असत. ज्या लांगीजवळ म्हणजेच किनाऱ्याजवळ किंवा बंदराजवळ घरे होती, त्यावरून त्यांच्या विभागाला किल्ला बंदर, पाचूबंदर इत्यादी नावे पडली. संयुक्त कुटुंब पद्धत वाढल्यामुळे आता जागा कमी पडत असल्यामुळे दुसरे घर जाऊन त्या जागी पक्की घरे बनवण्यात आलेली आहेत. सुक्या माशांचा व्यवसाय कमी झाल्यामुळे त्या जागंमध्येही पत्र्याची, स्लॅबची, वन प्लस वन घरे बांधण्यात आलेली आहेत.

(पूर्वार्ध)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 2:31 am

Web Title: historical home construction of christian society
Next Stories
1 मृत्यूही त्यांना विभक्त करू शकला नाही!
2 व्यावसायिक केंद्राच्या भूखंडावर अतिक्रमणे
3 फ्लेमिंगोंचे आगमन यंदा उशिराच
Just Now!
X