कोकण किनारपट्टीवरील प्राचीन बंदरांपैकी एक असलेल्या ठाणे शहरात गेल्या दोन हजार वर्षांत निरनिराळ्या संस्कृती नांदल्या. सातवाहन काळापासून ठाण्याचा उल्लेख आढळतो. शिलाहार काळात ठाणे हे राजधानीचे ठिकाण होते. तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख त्याच काळातील आहे. आता बरेच बदल झाले असले तरी शिलाहारकालीन संस्कृतीच्या वास्तुखुणा भग्न अवस्थेत का होईना शहरात ठिकठिकाणी दिसतात. त्याचप्रमाणे नंतरच्या काळात ठाणे शहरावर अंमल असणाऱ्या पोर्तुगीज वास्तुशैलीचे अवशेषही ठाणे शहरात आढळून येतात. कोलबाडमधील आराध्य वाडा त्यापैकीच एक..

कोणत्याही महानगराचा विस्तार हा परिसरातील लहान-मोठय़ा गावांचा मिळून होतो. ठाणे शहरही त्याला अपवाद नाही. मुळात आधुनिक ठाण्याला थोडी थोडकी नव्हे तर तब्बल दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास आहे. त्या त्या काळात नांदणाऱ्या संस्कृतीच्या खुणा अजूनही ठाण्यात आढळून येतात. काळानुरूप शहराचा चेहरामोहरा बदलतो, पण काही खुणा मात्र जुन्या गावाची आठवण सांगत असतात.

मुळचे ठाणे केवळ चेंदणी कोळीवाडा आणि स्थानक परिसरापुरते मर्यादित होते. आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नौपाडाही त्यावेळी शहराच्या बाहेर होते. मात्र आता नौपाडा, पाचपाखाडी परिसर ठाणे शहराचे मध्यवर्ती भाग ठरले आहेत. जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विभागांमध्ये कोलबाड, चरई यांचा समावेश होतो. येथील रहिवासी अजूनही आपल्या विभागाला ‘गाव’ म्हणतात. या गावात खोपट एस.टी बसस्थानकापासून थोडे पुढे उजव्या बाजूला चालत आल्यावर कोलबाड वस्ती लागते. सध्या या परिसरात बाहेरील रस्त्यावर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी उजव्या बाजूला आतील रस्त्यावर जुनी वसाहत आहे. त्यात ख्रिश्चन समाजाच्या नागरिकांची बहुसंख्या आहे. कोलबाड गावाला आठशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. पूर्वी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भात शेती, बागायती होत्या. जमीनदारी पद्धत होती. या भागात अनेक वर्षे पोर्तुगीज नागरिकांचेही वास्तव्य होते. त्याच्या खुणा अजूनही या भागात  दिसतात.

कोलबाडमधील शिवसेना शाखेच्या बाजूने आतील रस्त्याकडे वळल्यावर समोरच स्वातंत्र्य सैनिक महादेव सीताराम जाधव स्मृती, घर नं १२९ आराध्य नावाचा वाडा आपले लक्ष वेधून घेतो. १९२६ मध्ये वैद्य नावाच्या गृहस्थांनी हा वाडा दोनशे रुपयांना विकत घेतला. १९३१ मध्ये रेबेलो या ख्रिश्चन कुटुंबीयांना हा वाडा वैद्य यांनी चारशे रुपयांना विकला. या वाडय़ात रेबेलो कुटुंबीयांतील दोन भाऊ एकत्र राहात होते. सध्या या वाडय़ात राहत असलेल्या रोहित जाधव यांनी २०१५ मध्ये हा वाडा दीड कोटी रुपयांना विकत घेतला. बरीच वर्षे झाल्याने वाडय़ाची डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र जाधव कुटुंबीयांनी या वाडय़ाचा पूर्णत: कायापालट न करता बाहेरील वाडय़ाचा देखावा जुनाच ठेवून वाडय़ाच्या आतील भागात डागडुजी केली. बाहेरून या वाडय़ाचे निरीक्षण करताना जुन्या काळातील राजेशाही थाट भासतो. मुख्य प्रवेशद्वाराच्याजवळ असलेल्या चौथऱ्याजवळ दोन हत्तींचे पुतळे ठेवण्यात आल्याने वाडय़ात प्रवेश करताना हे हत्ती राजेशाही थाटानुसार आपले जणू स्वागतच करत असल्याचा भास होतो. तिथून चढून गेल्यावर वाडय़ाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लाकडी झुला ठेवण्यात आला आहे. वाडय़ात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस देवघराची स्वतंत्र व्यवस्था केलेली पाहायला मिळते. वाडय़ाच्या आतील बाजूस आधुनिक पद्धतीने सुधारणा केली असली तरी वाडय़ातील काही जुन्या पद्धतीच्या आखणीमुळे एखाद्या गावातील जुन्या वास्तूत प्रवेश केल्याचा आनंद मिळतो. मुख्य खोलीतून आत गेल्यावर डाव्या बाजूस स्वयंपाकाची खोली आहे. याच जागेतून वरच्या माळ्यावर जायला लाकडी जिना आहे. जिन्यावरून वरच्या माळ्यावर गेल्यावर डाव्या बाजूस आरामाची खोली आहे. या विश्रामगृहाबाहेर गॅलरी तयार करण्यात आली आहे. समोरील बाजूस सामान ठेवण्यासाठी खोली तयार करण्यात आली आहे. याच खोलीतून वरच्या जागेत पोटमाळा तयार करण्यात आला आहे. याच जागेत घरातील सदस्यांसाठी आधुनिक पद्धतीने जिम तयार करण्यात आली आहे. आराध्य या वाडय़ाच्या बाहेरील आवारात जुने फणसाचे झाड आहे. त्याला दरवर्षी मुबलक प्रमाणात फणस लागतात. त्याचप्रमाणे जंगली झाडपाला, शेवगा, परस अशी झाडे होती. याच ठिकाणी सुरुवातीला सामानाची खोली होती. जाधव कुटुंबीयांनी ही सामानाची खोली पाडून येथील जागा मोकळी केली. वाडय़ाच्या जागेत जमिनीमध्ये रेबेलो कुटुंबीयांनी वाडा बांधताना ख्रिश्चन समाजाची प्रतीक म्हणजेच क्रॉस पुरून ठेवलेले होते. जाधव कुटुंबीयांनी वाडय़ाची डागडुजी करताना हे क्रॉस काढून न टाकता तसेच ठेवले आहेत. विशेष म्हणजे या वाडय़ाच्या खिडक्या, दरवाज्यांची रचना जुन्या पद्धतीने गोलाकार प्रकारचीच ठेवण्यात आल्याने आधुनिक वाडय़ाला जुन्या वाडय़ाचे स्वरूप प्राप्त होते. या वाडय़ाला एकूण चौदा खिडक्या बसवण्यात आल्या आहेत. कोलबाड परिसरात गेल्यावर जुनेपण जपलेल्या हा आधुनिक वाडा पाहिल्यावर थेट तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या ठाण्यात फिरून आल्यासारखे वाटते.

आराध्य वाडा, कोलबाड, ठाणे