कल्याण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पारनाक्यावरील पोखरण (पुष्करिणी) या जलसाठा करणाऱ्या ऐतिहासिक विहिरीची महापालिकेकडून सफाई सुरू झाली आहे. ८० फूट खोल आणि २० हजार चौरस फूट परीघ क्षेत्रातील या विहिरीत गाळ साचल्याने याठिकाणी पाणीसाठा होत नव्हता. या पाण्याचा योग्य वापर व्हावा या उद्देशातून पालिकेने या विहिरीतील गाळ उपसला.
या विहिरीतील गाळ काढला तर त्यामध्ये भरपूर पाणीसाठा होईल. कुपनलिकांची पाण्याची पातळी वाढेल. परिसरातील रहिवाशांनी या पाण्याचा उपयोग केला तरी पालिकेच्या पाणीपुरवठय़ावर येणारा दाब काही प्रमाणात कमी होईल या विचारातून स्थानिक नगरसेविका डॉ. शुभा पाध्ये यांनी प्रशासनाकडे पोखरणमधील गाळ काढण्यासाठी तगादा लावला होता. या पुष्करणीमध्ये नोव्हेंबपर्यंत पाणीसाठा असतो. या विहिरीच्या तळाला पाच झरे आहेत. बाजूला दोन विहिरी आहेत. त्या कचरा, गाळाने भरल्या आहेत. त्यांचीही सफाई केली तर पारनाक्याच्या काही भागाला या विहिरीतून मुबलक पाणीपुरवठा होईल, असे कल्याणच्या इतिहासाचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास साठे यांनी सांगितले. बांधकामाविषयी इतिहासकारांमध्ये एकमत नाही. १६८९ मध्ये औरंगजेबाचा सरदार मातबर खान किंवा मलिक अंबर यांच्या काळात हे काम झाले असावे असा इतिहासकारांचा कयास आहे. पोखरणीच्या चोहोबाजूंनी गणपती, शंकर, राम आणि त्रिविक्रम मंदिरे आहेत. दोन पोकलेन, जेसीबी आणि क्रेनच्या साहाय्याने पोखरणची सफाई करण्यात आली. आठवडाभर हे काम सुरू आहे. पोखरणीच्या तळाला मुरूम लागला आहे. पोखरण गाळ, झाडेझुडपे, मातीने भरून गेली आहे. शेकडो टन गाळ या विहिरीतून काढण्यात आला. पोखरण परिसरातील इमारतींनी जलसंचय योजना राबवली, तर जमिनीत पाणी मुरेल, असेही ते म्हणाले.