विधान परिषदेसाठी डावखरेंनाच पाठिंबा
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांना पराभूत करण्यासाठी वसईच्या राजकारणातील सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मदत घेण्याचे डावपेच ठाकूर यांनीच ‘खोटे’ पाडले. जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर असा फौजफाटा घेऊन ठाकूर यांच्या दरबारी दाखल झालेले सेनेचे विधान परिषदेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना हितेंद्र ठाकूर यांनी भोजनाची मेजवानी दिली. मात्र, ‘आमचा पाठिंबा वसंत डावखरेंनाच’ असे सांगून सेनेच्या अपेक्षांना सुरुंग लावला. त्यामुळे शिवसेना नेत्यांना भरल्यापोटी पण रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडे तब्बल ५१२ मतदारांचे निर्णायक संख्याबळ आहे. असे असले तरी वसंत डावखरे यांच्यासारखा मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने शिवसेनेचे नेते अधिकाधिक मतांचे गणित कसे जुळविता येईल या प्रयत्नात आहेत. वसई-विरारच्या राजकारणातील सर्वेसर्वा मानले जाणारे हितेंद्र ठाकूर यांच्याकडे या निवडणुकीत तब्बल १२८ मतांचे संख्याबळ आहे. वसई-विरार महापालिकेत पक्षाचे १०९ नगरसेवक आहेत, शिवाय पाच स्वीकृत नगरसेवक मिळून तब्बल ११४ मते आहेत. मीरा-भाईदर महापालिकेत या पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेत १० तर वसई पंचायत समितीचे सभापतीपदाचे एक मत असे हे संख्याबळ आहे.
ठाकुरांची ही ताकद लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांच्यासोबत बैठक घेऊन या निवडणुकीसंबंधी चाचपणी केली होती. याशिवाय डावखरे यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याने ते आपली ताकद डावखरे यांच्यामागे उभी करतील अशी चर्चा आहे. असे असतानाही शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकूर यांचे घर गाठले. ठाकूर यांनीही या नेतेमंडळींचे स्वागत केले. परंतु, मदतीसाठी मात्र हात वर केले. ‘डावखरे यांच्याशी जुने संबंध असल्याने आमचा पाठिंबा त्यांनाच राहील’ असे ठाकूर यांनी सेनानेत्यांना सांगितल्याचे समजते.

डावखरे आणि माझे व्यक्तिगत संबंध आहेत. शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक हेदेखील माझे मित्र आहेत. डावखरे यांच्यासोबत असलेल्या स्नेहाची स्पष्ट कल्पना या भेटीत मी सेना नेत्यांना दिली आहे. दोन्ही पक्षांनी मिळून मार्ग काढला असता आणि निवडणूक टाळता आली असती तर बरे झाले असते.’
-हितेंद्र ठाकूर, नेते बविआ