News Flash

स्थलांतरित कामगारांमध्ये एचआयव्ही बाधित रुग्ण

या कामगारांची संख्या वाढती असून या कामगारांमध्ये गुप्तरोगाचे प्रमाणही आढळून येत आहे.

| September 4, 2015 02:21 am

सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणातील वास्तव
बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर भागात औद्योगिक क्षेत्र, गृहप्रकल्पांचे बांधकाम आदींमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित कामगार कार्यरत आहेत. या कामगारांची संख्या वाढती असून या कामगारांमध्ये गुप्तरोगाचे प्रमाणही आढळून येत आहे. याबाबत यश फाऊंडेशन या संस्थेने पुढाकार घेत या कामगारांची संपूर्ण आरोग्य व गुप्तरोग तपासणी तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समुपदेशनासाठी मोहीम उघडली असून यात काही एचआयव्ही व अन्य गुप्तरोग बाधित रुग्ण संस्थेला आढळून आल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.
गेल्या वर्षभरापासून यश फाऊंडेशन ही मूळची नाशिकची संस्था महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया यांच्या साहाय्याने बदलापूर ते उल्हासनगर या परिसरातील स्थलांतरित कामगारांसाठी एचआयव्हीबाबत जनजागृती कार्यक्रम राबवत आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमात स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बदलापूर ते उल्हासनगर या उपनगरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंड यांसारख्या राज्यांमधून शेकडो कामगार कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहेत. येथे समवयीन विविध स्वभावाच्या लोकांमध्ये राहून त्यांना काही वाईट सवयी लागण्याची दाट शक्यता असते. यातूनच अनेकदा असे कामगार विवाहबाह्य़ संबंध तथा वेश्यागमनाकडे वळतात. परंतु अपुऱ्या ज्ञानामुळे तसेच योग्य ती काळजी न घेतली गेल्यामुळे यातील अनेक जण एचआयव्हीसारख्या भीषण आजाराला बळी पडतात. शासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार विस्थापित कामगारांचे एचआयव्ही बाधितांमधील प्रमाणही चिंताजनक आहे. हे प्रमाण कमी व्हावे यासाठी यश फाऊंडेशन बदलापूर ते उल्हासनगरदरम्यान कार्यरत असल्याचे त्यांचे प्रकल्प व्यवस्थापक मयूरेश रोडगे यांनी सांगितले.दरम्यान, सध्या अंबरनाथमधून कार्य करणाऱ्या या यश फाऊंडेशनला या बदलापूर ते उल्हासनगर दरम्यान गुप्तरोग व एचआयव्ही झालेल्या स्थलांतरित कामगारांचे प्रमाण आढळल्याने या भागातील होणारा चोरटा वेश्या व्यवसायही अधोरेखित झाला असून हे वाढते प्रमाण या उपनगरांसाठी चिंताजनक असल्याचे मत काही जाणकारांनी नोंदवले आहे.
’बदलापूर ते उल्हासनगरमध्ये गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या शंभर आरोग्य तपासणी शिबिरांदरम्यान संस्थेमार्फत ३ हजार ५८१ कामगारांची शारीरिक चाचणी करण्यात आली.

’त्यापैकी २ हजार ७७४ कामगारांची एचआयव्हीची चाचणी करण्यात आली आहे.

’यात गुप्तरोग बाधित आढळलेल्या रुग्णांची संख्या ही १७६ असून १४ जणांना एचआयव्हीची लागण झाली असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे सर्वेक्षणादरम्यान निष्पन्न झाले आहे.

’या गुप्तरोग व एचआयव्ही बाधित रुग्णांची यश फाऊंडेशनमार्फत शासकीय आरोग्य केंद्रात नोंद करण्यात आली असून त्यांचे नेहमी समुपदेशन व त्यांच्या आरोग्याबाबत पाठपुरावा संस्था करत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 2:20 am

Web Title: hiv infected patients in migrant workers
Next Stories
1 वाढत्या चोऱ्यांच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांचा मोर्चा
2 भिवंडी-कल्याण भविष्यात मेट्रोमय!
3 उपनगरी सेवेचे वेध
Just Now!
X