|| सुहास बिऱ्हाडे

उपचारासाठी पालिका एआरटी कक्ष उभारणार

वसई-विरार शहरात पाच महिन्यांत ७२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघड झाले. एचआयव्हीबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका धास्तावली आहे. या रुग्णांच्या उपचारासाठी वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात एआरटी कक्ष सुरू करणार आहे.

एचआयव्ही रोगाबाबत जनजागृती केली जात असतानाही शहरात एचआयव्हीबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील पाच महिन्यांत शहरात तब्बल ७२ एचआयव्हीबाधित रुग्णांची नोंद पालिकेच्या रुग्णालयात झालेली आहे. आमच्याकडे आलेल्या क्षयरुग्णांची तसेच गरोदर मातांची आम्ही तपासणी करत असतो. त्यात हे रुग्ण आढळल्याची माहिती पालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र चौहान यांनी दिली. जानेवारीत १८, फेब्रुवारीत १२, मार्चमध्ये १४, एप्रिलमध्ये ९ आणि मे महिन्यात १९ एचआयव्हीबाधीत रुग्णांची नोद पालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. सध्या पालिकेकडे या आजारावर उपचार करण्याची सोय नाही. त्यासाठी पालिकेने शासनाच्या जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेशी चर्चा केली असून त्यांनी पालिकेला एचआयव्ही कक्षासाठी विनामूल्य औषधे देण्याचे मान्य केले आहे. वसई पूर्वेच्या वालीव येथील नागरी आरोग्य केंद्रात यासाठी एआरटीसी कक्ष उभारण्यात येणार आहे.

काय आहे एआरटीसी सेंटर?

एआरटी म्हणजे अ‍ॅटी रॅट्रोव्हायरल थेरेपी सेंटर. एचआयव्हीबाधित रुग्णांना विशिष्ट औषधे घ्यावी लागतात आणि ती औषधे घेतल्यानंतर त्याचा परिणाम कसा होतो हे पाहण्यासाठी नियमित तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या एआरटी सेंटरमध्ये होतात. याबाबच माहिती देताना एड्स रोगावर काम करणाऱ्या कृपा फाऊंडेशनच्या अमित पटेल यांनी सांगितले की, एचआयव्हीबाधित रुग्णांसाठी लागणारी औषधे महाग असतात. यासाठी साधारण रुग्णाला दोन ते तीन हजारांचा खर्च येतो. मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ही औषधे मिळतात. मात्र गेल्या आठ महिन्यांत तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे वसईच्या रुग्णांना केईएम, जेजे, नायर किंवा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात जावे लागते.