|| कल्पेश भोईर 

पालिकेची पूर नियंत्रण उपाययोजना कागदावरच; पूरस्थितीचा धोका कायम

वसई : सलग तीन वर्षे पावसाळ्यात वसई-विरार शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यामागच्या कारणांचा अभ्यास पालिकेने केला. यात पूरनियंत्रणासाठी नालेसफाई सोबतच नालासोपारा निळेमोरे येथे धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड) विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र या कामाला पालिकेने अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे यंदा अतिवृष्टी झाल्यास शहराची स्थिती काय, असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

शहरातील नाले आणि नजीकच्या परिसरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण , बेकायदा माती भराव आणि बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे गेली तीन वर्षे शहरावरील पूरसंकट कायम आहे.

पावसाळ्यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत होत आहे. पुरामुळे वीजपुरवठा खंडित होऊन येथील पाणीपुरवठा बंद पडला. याच वेळी रेल्वेरूळांवर पाणी साठून त्या ठप्प झाल्या.  वाहतूक ठप्प तसेच शहरातील अनेक भागांत पाणी जाऊन कोटय़वधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. ही पूरपरिस्थिती का निर्माण झाली आणि भविष्यात पूरस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती.

त्यांनी दिलेल्या अहवालानुसार शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी व पावसाचे पडणारे पाणी शहरात साठून राहू नये व पाणी जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी धारण तलाव (होल्डिंग पॉन्ड) विकसित करणे आवश्यक आहे यासाठी पालिकेने नालासोपारा पश्चिमेकडील नीळेमोरे येथे १९ हजार ८६० चौरस मीटर क्षेत्र पालिकेने आरक्षित केले आहे, मात्र या भागात केवळ सूचना फलक आणि तारांचे संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही.  सिडकोने २००६ मध्ये केंद्राच्या समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणात दोन धारण तलावांच्या जागा आरक्षित केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहराचे नियोजन करून धारण तलाव विकसित करण्याचा निर्णय घेऊन धारणतलावांची खोली वाढविणे, त्यातील पाणी खाडीला मिळविण्यासाठी मार्गिका तयार करणे अशी कामे पालिकेतर्फे हाती घेतली जाणार होती परंतु धारणतलावांच्या विकासासाठीच पालिकेच्या वतीने कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने पुन्हा वसई पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

‘समितीच्या सूचना पाळा’

नुकताच झालेल्या महासभेत वसई-विरार शहरात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण, गाळ उपसा करून नालेसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या सोबतच नाल्यावर झालेली अनधिकृत बांधकामे बाजूला करून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. परंतु आरक्षित केलेले धारणतलाव हे ही विकसित करण्याकडे लक्ष दिले तर पूरस्थितीवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण  मिळवता येईल. यासाठी सत्यशोधन समित्यांनी दिलेल्या अहवालानुसार योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पालिकेने धारण तलाव तयार करण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. या कामासाठी ७० एकर जागाही हस्तांतरित करण्यात आली आहे. लवकरच पुढील कामाला सुरुवात केली जाईल. -राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता महापालिका