धुळवडीनिमित्त वसई-विरार शहारात स्वदेशी वस्तूनाच पसंती दिली जात आहे. विविध रंग, पिचकाऱ्या, फुगे यांचा त्यात समावेश आहे. बाजारपेठेत व्यावसायिकांनी चिनी वस्तू दुकानात न ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने यंदा चिनी वस्तू बाजारपेठेबाहेरच आहेत.

कमी किमतीमध्ये असलेल्या चिनी वस्तू बाजारपेठेत गर्दी करत होत्या. मात्र यावर्षी चिनी वस्तूंऐवजी भारतीय बनावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा गजबजल्या आहेत. त्यामुळे चिनी वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या धुळवडीनिमित्त रंग उधळण्यासाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, रंग यांची मागणी वाढली आहे. वसईतील दुकाने विविध रंग आणि पिचकाऱ्यांच्या साहित्याने सजली असून खरेदीसाठी गर्दी होत आहे.

यंदा वसईच्या बाजारपेठेत पिचकाऱ्यांचे आकार आणि नमुण्यात वेगळेपण दिसून येत आहे. बाहुबली, टायगर, डोरेमॉन, छोटा भीम, आर्यन मॅन यांसह विविध कार्टुनच्या आकारातील पिचकाऱ्या लहान मुलांना आकर्षित करत आहेत. यंदा पिचकाऱ्यांच्या किमती वाढल्या असून ५० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत आहेत, असे वसईतील दुकानदार राज मिश्रा यांनी सांगितले. यंदा भारतीय वस्तू बाजारपेठेमध्ये असल्याचे मागील वर्षांच्या तुलनेत मोठय़ा पिचकाऱ्यांच्या किमतीमध्ये २० ते ३० रुपयांनी वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.