सोसायटी, रिसॉर्टमध्ये पाण्याचीे उधळण; लाखो लिटर पाणी वाया, पर्यटकांची तुडुंब गर्दी
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर धुळवड साजरी करू नका, या आवाहनाला वसईतील रहिवाशांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. सोसायटी आणि रिसॉर्ट यांनी लाखो लिटर पाण्याचीे उधळण करत धुळवड साजरी केली.
यंदाच्या मोसमात राज्यात भीषण दुष्काळ पडला असून तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. या पाश्र्वभूमीवर होळीत पाण्याचा अपव्यय करू नका, असे आवाहन शासकीय पातळीवर तसेच विविध संस्थांच्या मार्फत करण्यात येत होते. त्यामुळे यंदा कोरडी होळी होईल किंवा होळी उत्सवाचे आयोजन केले जाणार नाही, अशी शक्यता होतीे. परंतु वसईच्या अनेक रिसॉर्टमध्ये विशेष होळी उत्सवाचे आयोजन करून पाण्याचीे उधळपट्टी करण्यात आलीे. सलग आलेल्या सुटय़ांमुळे मुंबईच्या हौशी पर्यटकांनी वसईतले रिसॉर्ट फुलून गेले होते. खास धूलिवंदनसाठी विशेष रेन डान्सचे आयोजन करण्यात आले होते. सर्व रिसॉर्ट पर्यटकांनी तुडुंब भरल्याचे दिसून येत होते. विरारजवळील अर्नाळा येथे, तसेच पूर्व पट्टीत कामण भिवंडी मार्गावर अनेक रिसॉर्ट आहेत. तेथील रिसॉर्टला लोकांनी खच्चून भरले होते. किनाऱ्यावर गाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत पश्चिम पट्टय़ातील एका रिसॉर्टचालकाशी संपर्क केला असता आम्ही पालिकेचे पाणी वापरत नाही. आमच्या स्वत:च्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यातून आम्ही पाणी वापरतो. हा मोसम आमचा धंद्याचा असतो. त्यामुळे रिसॉर्ट बंद क रून आम्ही दुष्काळग्रस्तांप्रति सहानभूती व्यक्त क रू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
मूळात असे सगळे रिसॉर्ट किंवा वॉटर पार्क यात पाणी हे मुख्य आकर्षण असते. सुट्टीसाठी लोक येत असतात. होळीच्या दिवशी रंग खेळल्यावर पाणी आवश्यक असते. त्यामुळे आम्हाला त्याची सोय करावी लागते, असे विरारच्या एका रिसॉर्टचालकाने सांगितले. लोकांनी आगाऊ नोंदणी करून ठेवल्या होत्या. ‘पाणी वाचवा’ असे आवाहन केले असले तरी त्या नोंदणी रद्द करता येणे शक्य नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
वसईच्या अनेक भागांतील उच्चभ्रू सोसायटय़ांमध्ये होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी डीजेच्या तालावर संगीताचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याचे टँकर मागवून होळी साजरी केली जात होती. टंचाई असलेल्या इमारतींना टँकरने पाणीे पुरवठा आणि दुसरीकडे याच टँकरने होळी साजरी होत असल्याचे दोन विरोधाभास दर्शविणारे दृश्य दिसत होते. दुसरीकडे अनेकांनी होळी खेळल्यानंतर समुद्राकडे धाव घेतलीे होतीे. सुरुची बाग समुद्रकिनाऱ्यावरही मोठी गर्दी जमली होती.