होली क्रॉस करोना रुग्णालयातील प्रकार; सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवरच उपचार

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज ४००हून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच, महापालिकेने करोना रुग्णालय म्हणून घोषित केलेल्या कल्याणमधील होली क्रॉस खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग १५ दिवसांपासून बंद असल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे गंभीर लक्षणे असलेल्या करोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेतले जात नसून या ठिकाणी केवळ सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने लाखो रुपये खर्च करून कल्याणमधील रामबागेतील होली क्रॉस खासगी रुग्णालय अधिग्रहित करून तिथे करोना रुग्णालय सुरू केले आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रणा १५ दिवसांपासून बंद असल्याने करोनाची साधी लक्षणे असलेल्या रुग्णांवरच येथे उपचार केले जात आहेत. अतिगंभीर रुग्णांना पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये पाठविले जाते, असे होली क्रॉस रुग्णालयाशी संबंधित डॉक्टरने सांगितले. तसेच अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रणा मागील १५ दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी रुग्णांनी नातेवाईकांकडे केल्या असून त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पालिका हद्दीत करोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर प्रशासनाने एप्रिलमध्ये लाखो रुपये खर्च करून या रुग्णालयात अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा, अतिदक्षता विभाग, कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध करून दिली होती. पालिका हद्दीतील करोना रुग्णांवर उपचार करणारे अत्याधुनिक सुविधायुक्त रुग्णालय असा या रुग्णालयाचा नावलौकिक असून करोना रुग्णसंख्या वाढत असताना या रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग बंद पडला आहे. दरम्यान, बंद यंत्रणा सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे पाठविला आहे. पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुरेश कदम यांनी या खर्चाला मंजुरी दिल्यानंतर दुरुस्तीची प्रक्रिया तात्काळ सुरू होईल, असे एका डॉक्टरने सांगितले. तर पालिकेच्या एका डॉक्टरने यंत्रणा बंद असल्याची कबुली दिली आहे. याबाबत पालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुरेश कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद दिला नाही.

दुरुस्तीविना पडून

रुग्णालयाकडून पालिकेकडे पाठविण्यात आलेला प्रस्तावित खर्चाचा प्रस्ताव काही लाखांच्या घरात आहे. एवढय़ाशा दुरुस्तीसाठी एवढा खर्च कशासाठी, असा प्रश्न वैद्यकीय विभागाने उपस्थित केला आहे. बाहेरील तज्ज्ञ व्यक्तीकडून या दुरुस्तीसाठी किती खर्च येईल, याची माहिती घेऊन त्याप्रमाणे दुरुस्ती खर्चाचा अहवाल तयार करावा, असे वैद्यकीय विभागाचे मत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुरुस्तीच्या मोठय़ा आकडय़ांमुळे होली क्रॉसमधील यंत्रणा दुरुस्त होत नसल्याचे सुत्रांकडून समजते.

सततच्या वापरामुळे श्वसन यंत्र, प्राणवायू वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाले आहेत. या यंत्रणा विविध कंपन्यांच्या आहेत. त्यांचे देखभाल अभियंते करोना रुग्णालय असल्याने दुरुस्तीसाठी येण्यास तयार होत नाहीत. या बंद यंत्रणेमुळे अतिदक्षता विभाग तात्पुरते बंद ठेवलेत. या तांत्रिक बिघाडांची दुरुस्ती रुग्णालय प्रशासन करून घेईल आणि त्याचे झालेले देयक पालिकेकडे पाठवून देण्यात येईल.

-डॉ. प्रशांत पाटील, अध्यक्ष, आय.एम.ए., कल्याण</p>