‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून रंगलेल्या वादावर पडदा टाका’ अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या असताना ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुरंदरे यांच्याविरोधातील सूर कायम ठेवला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार करण्यासंबंधी शिवसेना-भाजपने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आणलेल्या प्रस्तावास काँग्रेस-राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला. या मुद्दय़ावर पालिकेत जोरदार वादावादी झाली. मात्र, बहुमताच्या जोरावर सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.
महाराष्ट्र शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादावर पडदा टाका, असे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादीच्या ठाण्यातील नगरसेवकांनी आपला विरोध सुरूच ठेवला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करावा, असा प्रस्ताव शिवसेना-भाजपने मांडला होता. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, शिवसेनेचे गटनेते संतोष वडवले, भाजपचे गटनेते संजय वाघुले, नगरसेवक मुकेश मोकाशी यांनी ही प्रस्तावाची सूचना मांडली होती. या प्रस्तावास काँग्रेस – राष्ट्रवादीने कडाडून विरोध करत जय जिजाऊ , जय शिवराय अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामध्ये आव्हाडसमर्थक नगरसेवक आघाडीवर होते. अखेर शिवसेनेने त्यांचा विरोध डावलून मतदानाच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला.
शिवसेना-काँग्रेसमध्ये हमरीतुमरी
ठाणे शहरातील कूपनलिकांच्या प्रस्तावावरून चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नगरसेवक मनोज शिंदे यांनी शिवसेना नगरसेवकांना उल्लू असे म्हटले. यावरून शिवसेना तसेच विरोधी पक्षांच्या नगरसेविकांमध्ये हमरीतुमरी झाली. या गोंधळातच सभा तहकूब करण्यात आली.