ठाणे, पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचे नियोजन

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील २८ हजार एचआयव्ही रुग्णांना करोनाच्या काळात कोणत्याही अडथळ्याशिवाय औषधोपचार मिळावे यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. रुग्णालयात येणे शक्य नसलेल्या रुग्णांना आणि प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांना खासगी संस्थेच्या मदतीने घरपोच औषधे पुरविण्यात येत आहेत.  तीन महिन्यांची औषधे एकच वेळी देण्यात येत आहेत.

टाळेबंदीत एचआयव्हीसारखा आजार असणाऱ्या रुग्णांचे  हाल होत असल्याने  ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने हे नियोजन आखले आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एचआयव्हीची बाधा असलेले एकुण २८ हजार नोंदणीकृत रुग्ण आहेत.

या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात सात आरटी केंद्रे आहेत. तर पालघर जिल्ह्यात सामान्य रुग्णालय नसल्याने तेथील एचआयव्ही रुग्णांवर येथील आरटी के ंद्रामार्फत उपचार करण्यात येतात. मात्र, टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने तसेच अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र असल्याने रुग्णांना उपचारासाठी आरटी केंद्र गाठणे शक्य होत नाही. अशा समस्या असणाऱ्या सर्व रुग्णांना जिल्हा आरोग्य विभागाने आयटेक आणि विहान या खासगी संस्थांमार्फत घरपोच औषधे देण्यास सुरुवात केली आहे.

या रुग्णांनी रुग्णालयाशी संपर्क साधल्यास त्यांना घरपोच औषधे पुरविण्यात येत आहेत. त्याचबरोबर रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना करोना साथीच्या काळात सतत रुग्णालयात यावे लागू नये यासाठी त्यांना तीन महिन्यांची औषधे एकाचे वेळी देण्यास येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांनी दिली.

त्यासाठी सर्व आरटी केंद्रांमध्ये अतिरिक्त औषधांचा साठा करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्व आरटी केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत.

ज्या एचआयव्ही रुग्णांना रुग्णालयात येणे शक्य नसून त्यांना आरोग्याबाबत काही समस्या असल्यास त्यांनी १०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

एचआयव्ही रुग्णांना केंद्रामार्फत संपर्क

जिल्ह्यातील प्रत्येक एचआयव्ही रुग्णाची आरटी केंद्रात उपचारासाठी नोंद केलेली असते. तो रुग्ण नेमूण दिलेल्या आरटी केंद्रातच उपचार घेत असतो. अशा रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या औषधांची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाला वेळोवेळी प्राप्त होत असते. टाळेबंदी सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पाच ते सहा हजार एचआयव्ही रुग्णांचा आरटी केंद्रांसोबतचा संपर्क तुटला आहे. अशा रुग्णांसोबत केंद्रातील कर्मचारी संपर्क साधत आहेत. तसेच त्यांच्या आरोग्यविषयीची विचारपूस करून त्यांना औषधोपचाराबाबत अधिक माहिती दिली जात आहे.