09 March 2021

News Flash

टाळेबंदीच्या काळात महामुंबईशी ‘किसान कनेक्ट’

अहमदनगरमधील तरुण शेतकऱ्यांच्या माध्यमातून घरपोच भाजीपाला

अहमदनगरमधील तरुण शेतकऱ्यांच्या माध्यमातून घरपोच भाजीपाला; चार महिन्यांत तीन कोटींची उलाढाल

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी फारसा प्रतिसाद देत मिळत नव्हता. यातूनच अहमदनगर जिल्ह्य़ातील दहा ते बारा तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘किसान कनेक्ट’च्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात स्वत:ची बाजारपेठ निर्माण केली आहे.

राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना शहरी भागात थेट भाजीपाला विक्रीसाठी परवानगी दिली. मात्र, शहरात भाजीपाला विक्रीसाठी जागा मिळेल का आणि शहरात ठिकठिकाणी भाजीची दुकाने असल्याने आपली भाजी विकली जाईल का, अशा प्रश्नांमुळे अनेक शेतकरी व्यापाऱ्यांमार्फतच भाजीपाला विक्रीसाठी पाठवीत आहेत. मात्र, करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मार्च महिन्याच्या अखेरीस टाळेबंदी लागू केली. शेतमालाच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते अडचणीत आले. अशा वेळी अहमदनगर जिल्ह्य़ातील राहता तालुक्यामधील दहा ते बारा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘किसान कनेक्ट’ची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात थेट घरपोच भाजीपाला विक्री सुरू केली.

अहमदनगर जिल्ह्य़ातील राहाता तालुक्यामधील उर्मिला हर्दे, भाऊसाहेब आहेर, अरुण मुथे, तारकचंद कडू, श्रीकांत ढोकचौळे, मनीष मोरे, सुमित लांडे या तरुण शेतकऱ्यांनी किसान कनेक्टची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून गेल्या चार महिन्यांत फळ आणि भाजीपाल्याच्या ८० हजार बॉक्सची विक्री करण्यात आली असून त्याची उलाढाल ३ कोटींच्या आसपास आहे.

शून्यातून नवी बाजारपेठ

या शेतकऱ्यांनी मुंबईतील नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने ९ एप्रिलला ६० ते ७० भाजीपाला बॉक्सची मुंबईत विक्री केली. ताजा आणि स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची संख्या वाढली. याशिवाय, समाजमाध्यमातूनही अनेक ग्राहक जोडण्यात आले. ‘सुरुवातीला दहा ते बारा शेतकरी होते. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्य़ातील ४८० शेतकरी जोडले गेले असून त्यांच्या माध्यमातून मुंबई महानगर क्षेत्रात भाजीपाला पाठविण्यात येत आहे. शेतकऱ्यांशी थेट ग्राहक जोडला जात असल्याने ‘किसान कनेक्ट’ची स्थापना करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून ही विक्री केली जाते,’ अशी माहिती श्रीकांत ढोकचौळे या शेतकऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 1:56 am

Web Title: home delivery of vegetables by young farmers of ahmednagar zws 70
Next Stories
1 काढय़ांमुळे आल्याला चढा भाव
2 तेवीस लाख शेतकऱ्यांना बांधावर खतपुरवठा
3 परिवहनच्या असुविधेमुळे प्रवाशांचा उद्रेक
Just Now!
X