वसई-विरार पालिकेच्या उदासीनतेचा फटका; विराटनगरच्या बाजारपेठेत बेघरांचे निवारा केंद्र

रस्त्यावरील फेरीवाल्यांची समस्या दूर करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने शहरात विविध ठिकाणी बाजारपेठांची निर्मिती केली. मात्र या बाजारपेठांकडे फेरीवाल्यांनी पाठ फिरवली आहे. या बाजारपेठांमध्ये ग्राहक येत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरार पश्चिमेच्या विराट नगर येथील बाजारपेठेत तर बेघरांचे निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे.

वसई-विरार शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न जटिल बनत चाललेला आहे. जागोजागी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यावर अस्वच्छता आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून महापालिकेने या फेरीवाल्यांना कायमस्वरूपी बसण्यासाठी बाजारपेठ उभारण्याचा निर्णय घेतला. शहरातील ५१ ठिकाणी अशा बाजारपेठ तयार करण्याचे प्रस्तावित आहे. शहरात शक्य होईल तितक्या फेरीवाल्यांना मानवतावदी दृष्टिकोनातून अन्यथ स्थलांतरित करण्याच्या हेतूने या बाजारपेठा विकसित करण्यात येत आहेत. सध्या २० बाजारपेठा विकसित करण्यात आल्या आहेत. मात्र या बाजारपेठांकडे फेरीवाले पाठ फिरवत आहेत. या बाजारपेठा रहदारीच्या रस्त्यापासून दूर आडमार्गाला असल्याने नागरिक खरेदीसाठी फिरकत नाही. त्यामुळे फेरीवाले या बाजारपेठेत न बसता पूर्वीप्रमाणे रस्त्यावर बसत आहेत.

जे फेरीवाले बाजारपेठेत बसतात त्यांना पालिकेच्या अनास्थेचा फटका सहन करावा लागत आहे. विरार पश्चिम येथील विराटनगर या परिसरातही एक बाजारपेठ अशीच ओस पडलेली आहे. दोन वर्षांपूर्वी पालिकेने नूतनीकरण करून ही बाजारपेठ पुन्हा सुरू केली. या बाजारपेठेचा एक भाग पालिकेने बेघरांसाठी रात्र निवारा म्हणून तयार केला आहे. त्यातच पालिकेने गोदाम म्हणून याचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेचे भंगार साहित्य कचऱ्याचे डबे, तुटलेले पाइप आदी आणूण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी या बाजारपेठेतून काढता पाय घेतला आहे. आता केवळ दोन भाजीविक्रेते या बाजारपेठेत बसत आहे.

आम्ही रीतसर पैसे भरून इथे बसतो. परंतु इथे एवढी गैरसोय आहे की ग्राहकही फिरकत नाही, असे येथील विक्रेते भानुशाली झा यांनी सांगितले. इथे भाजीविक्रेते बसावेत, अशी पालिकेची अपेक्षा आहे तर तशा सुविधा त्यांनी द्यायला हव्या. एवढय़ा गलिच्छ वातावरणामुळे कुणी इथे येत नाही असे ते म्हणाले. विराटनगर येथील बाजारपेठेत आता केवळ तीन ते चार भाजीविक्रेत बसतात. रस्त्यावर आम्ही विक्री करायला गेलो तर आमच्या दंडाची कारवाई होते. सारखे पळापळ होते, त्यामुळे आम्हाला नाइलाजाने इथे बसावे लागते, असे इथल्या फेरीवाल्यांनी साांगितले.

फेरीवाल्यांना हटविण्यासाठी बाजारपेठेची संकल्पना चांगली होती. मात्र नियोजनाचा अभाव आणि ती राबवण्यासाठी इच्छाशक्ती नसल्याने बाजारपेठेसाठी लागणारे कोटय़वधी रुपये वाया जात आहेत.

भाजीवाले स्वत: या बाजारपेठेत यायला तयार नसतात. आम्ही अनेकदा प्रयत्न केले आहेत. पण ते येण्यास तयार नाहीत. ग्राहकही रस्त्यावरून जाताना रस्त्याकडेला असलेल्या फेरीवाल्यांकडून खरेदी करतात. आडमार्गवरील सुसज्ज बाजारपेठेत यायला ते तयार नसतात. त्यामुळे फेरीवाले या बाजारपेठेत बसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. २५ भाजीवाले आले तरी आम्ही ते पुन्हा व्यवस्थित सुरू करू.

-किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महापालिका