21 September 2020

News Flash

गरिबांची ‘ती’ घरे करोना रुग्णांसाठी आधार

बदलापुरातील ‘बीएसयूपी’ योजनेच्या इमारतीतील केंद्र फायदेशीर

बदलापुरातील ‘बीएसयूपी’ योजनेच्या इमारतीतील केंद्र फायदेशीर

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या कारभारामुळे १४ वर्षे बीएसयूपी योजनेतील घर बांधणी रखडल्याने गरिबांना घरे मिळाली नाहीत. मात्र करोनाच्या संकटात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी आणि अलगीकरणासाठी हीच घरे उपयोगी ठरली आहेत. या योजनेतील १ हजार ६३४ मंजूर घरांपैकी सोनिवली येथील ३१ इमारतींमधील ६०० घरे तयार असून त्यातून २४ इमारतींमधील घरे सध्या वापरात आहेत.

झोपडपट्टी स्थलांतरण, रस्ते किंवा इतर सार्वजनिक प्रकल्पांच्या आड येणाऱ्या घरांना पर्याय म्हणून बदलापूर शहरात बीएसयूपी योजना राबवण्यात आली होती. केंद्र शासनाने २००५ साली शहरी गरिबांसाठी ही योजना जाहीर केली होती. त्यानुसार २००६ मध्ये अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रात या योजनेला मंजुरी देण्यात आली होती. जागा आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे अंबरनाथमध्ये या योजनेची वीटही रचली गेली नाही. तर बदलापुरात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू होत्या. मंजुरीनंतर ३ वर्षे या योजनेचे सर्वेक्षणही पूर्ण झाले नव्हते. प्रत्यक्ष कामाला २०१० साली सुरुवात झाली. त्यामुळे सुरू होण्यापूर्वीच ४ वर्षे रेगांळलेली योजना कधी पूर्ण होईल याबाबत साशंकता होती. तरी बदलापूर शहरात १ हजार ६३४ घरे मंजूर करण्यात आली होती. त्यातील म्हाडा येथील १६ इमारतींमध्ये ३२० तर सोनिवली येथे पहिल्या टप्प्यात २४ इमारतींत ४८० घरे आणि दुसऱ्या टप्प्यात ७ इमारतींत १४० घरांचे काम केले जाणार होते. यातील बहुतांश काम पूर्ण झाले. सोनिवली येथील पहिल्या टप्प्यातील ४८० घरे गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडली होती. लाभार्थ्यांच्या यादीतील घोळामुळे या घरांचे वाटप होऊ  शकले नाही. डिसेंबर २०१८ मध्ये लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र यादीतील लाभार्थ्यांनी त्यांच्या वाटय़ाला येणारी ठरावीक रक्कम न भरल्याने या योजनेतील घरवाटपांचे काम पूर्ण होऊ  शकले नाही. त्यामुळे लाभार्थी अनेक वर्षांपासून घरांच्या प्रतीक्षेत आहेत.

याच प्रकल्पातील घरे आता करोनाच्या संकटात उपयोगी ठरत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बदलापुरातील याच प्रकल्पातील २४ इमारती करोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यासाठी वापराबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर याच ठिकाणी कोविड काळजी केंद्र सुरू आहे. यात विलगीकरणासाठी ३६० तर काळजी केंद्रासाठी ५२० खाटांची व्यवस्था आहे. क्षमता वाढवण्यासाठी संधी आहे. सध्या येथे ३२० रुग्ण दाखल करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2020 3:46 am

Web Title: homes built of the poor use for isolation of corona patients zws 70
Next Stories
1 करोना रुग्णांची लूट सुरूच
2 समुद्रकिनाऱ्यांवर मच्छीमारांची लगबग
3 रेल्वे प्रवासासाठी धडपड
Just Now!
X