अत्यंत सुस्वच्छ , शिस्तप्रिय, निसर्ग सौदर्यानी नटलेले आणि पर्यावरणाला प्राधान्य देणारे हाँगकाँगला पर्यटकांची मोठी पसंती असते. या सुनियोजित देशाची शब्दसफर घडविण्यासाठी प्रसिध्द लेखिका पद्मा कऱ्हाडे यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. विविसु डेहरा या डोंबिवली येथील संस्थेने ‘जडला पर्यटनाचा छंद, गप्पा मारू स्वच्छंद’ या उपक्रमात ‘हॉगकॉग वर बोलू काही’ हा मुलाखत वजा गप्पांचा कार्यक्रमात आयोजित केला होता. प्राची गडकरी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी परदेशवारी करावी असे वाटत असते आणि परतल्यानंतर त्याच्या वर्णनाची तितकीच तीव्र इच्छा असते. अभ्यासु वृत्तीने, मोजक्या शब्दात वर्णन करण्याचे कसब पद्मा कऱ्हाडे यांनी आपल्या हाँगकाँग सफारी’ या त्यांच्या पुस्तकातून साधले आहे. यावेळी त्यांनी त्या देशातील वैशिष्टय़े सांगितली. शिस्त, स्वच्छतेला तिकडे प्राधान्य असल्याचे त्या म्हणाल्या. शेवटी संस्थेचे अध्यक्ष विलास सुतावणे यांनी मनोगत व्यक्त केले.