News Flash

शालेय विद्यार्थ्यांना हुक्का पेनचे आकर्षण

या हुक्का पेनचा नशा येण्यासाठी वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मीरा-भाईंदरमधील दुकानांमध्ये सर्रास विक्री; पालकांसह शिक्षकांपुढे डोकेदुखी

एकीकडे तरुणांचे हुक्का पार्लरकडे वाढते आकर्षण चिंता वाढवणारे असतानाच आता शालेय विद्यार्थ्यांमध्ये हुक्का पेनचा वापर वाढू लागला असल्याने पालकांसह शाळा चालकांपुढे नवीनच डोकेदुखी उभी राहू लागली आहे. या हुक्का पेनचा नशा येण्यासाठी वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तंबाखूविरहित हुक्का पार्लर चालवण्यासाठी परवानगी असल्याने मीरा रोडमध्ये अनेक ठिकाणी हुक्का पार्लर थाटण्यात आली आहेत. या पार्लरमध्ये तरुणांचाच भरणा अधिक असतो. हुक्क्याद्वारे धूर सोडण्याची मजा अनुभवण्यासाठी तरुण हुक्का पार्लरमध्ये जात असतात. परंतु या हुक्का पार्लरच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ हुक्क्यातून ओढले जात असल्याचे अनेक वेळा उघडकीस झाले आहे. मनोरंजनाच्या नावाखाली तरुणांना व्यसनाधीन केले जात असल्याने मीरा रोडमधील अनेक हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. परंतु आता या हुक्क्याचे लोण हळूहळू शाळेमध्येही पसरू लागले आहे.

मीरा रोडमधील एका नामांकित शाळेत एका विद्यार्थ्यांने हुक्का पेन आणल्याचे एका जागरूक विद्यार्थिनीने उघडकीस आणल्याने हुक्का पुन्हा चर्चेत आला आहे. साध्या पेनसारखे दिसणारेच हे हुक्का पेन असते. हे पेन बॅटरीवर चालते. पेनमध्ये असलेल्या रिफिलमध्ये द्रव पदार्थ भरलेला असतो. विशेष म्हणजे ७०० रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत मिळणारे हे पेन मीरा रोडमधील काही दुकानांत तसेच पानाच्या दुकानात सहज उपलब्ध आहे.

हुक्का पार्लरमध्ये ज्याप्रमाणे हुक्क्यात तंबाखू मिसळला जातो, त्याचप्रमाणे या हुक्का पेनमध्येही तंबाखूजन्य द्रव्य वापरले जात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे एका शिक्षकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

पालकांना चिंता

शाळेत सहाव्या-सातव्या इयत्तेते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे हे पेन हल्ली दिसून येऊ लागले आहे. शिक्षकांनी पेनबद्दल विचारणा केली तर विद्यार्थी निरनिराळी कारणे पुढे करतात. कधी मित्रांनी ठेवायला दिले आणि चुकून ते सोबत आणले, अथवा गंमत म्हणून मित्रांना दाखविण्यास आणले, अशी कारणे हे विद्यार्थी सांगतात. शाळेत हुक्का पेन विद्यार्थी ओढत असल्याचे अद्याप दिसून आले नसले तरी शिक्षकांच्या नकळत त्याचे सेवन केले जात असल्याची भीती शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 12:55 am

Web Title: hookah pen attractions in school
Next Stories
1 कोकण शिक्षक मतदार संघात भाजपला आव्हान
2 शिवसेनेचा प्रतिहल्ला
3 सेनेविरोधात फलकयुद्ध
Just Now!
X