संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ठाणे पोलिसांनी विकसित केलेल्या ‘होप’ मोबाइल अ‍ॅपला नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे उघड झाले आहे.

या सुविधेकडे पाठ फिरविणाऱ्या नागरिकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता पुन्हा एकदा माध्यमांमार्फत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाच ते सहा महिन्यांपूर्वी ‘होप’ नावाचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार केले. कोणत्याही अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर सहजपणे आणि मोफत डाऊनलोड करता येऊ  शकेल. तसेच नागरिकांना त्याचा वापर कसा करावा हे समजू शकेल, अशा स्वरूपाचे अ‍ॅप आहे.

एखाद्या संकटात सापडलेल्या व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी या उद्देशातून पोलिसांनी हे अ‍ॅप तयार केले. हे अ‍ॅप सुमारे एक हजार नागरिकांनी मोबाइलमध्ये डाऊनलोड केले असून त्यापैकी एकानेही पोलिसांसोबत संपर्क साधलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच ही सुविधा खरेच तत्पर आहे का हे जाणून घेण्यासाठी ४० ते ५० कॉल आले आहेत.

त्याचप्रमाणे अ‍ॅपचा वापर करताना मदतीसाठी असणारे पर्यायाचे बटन अनेकांकडून चुकीने दाबले गेल्याचे आतापर्यंत आलेल्या तक्रारीवरून समोर आले आहे. त्यामुळे या सुविधेकडे नागरिक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी पुन्हा माध्यमामार्फत या सुविधेविषयी जनजागृता करण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये या सुविधेचा वापर कसा करावा आणि ते किती महत्त्वाचे आहे, यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड कसे करावे?

स्मार्टफोन मोबाइलमधील प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप्स स्टोअरमध्ये ‘होप ठाणे पोलीस’ असे शोधावे. हे अ‍ॅप मिळाल्यानंतर डाऊनलोड करावे. डाऊनलोड होत असताना मोबाइल स्क्रीनवर नोंदणी फॉर्म दिसेल, त्यामध्ये विचारलेली माहिती भरा. त्यानंतर अ‍ॅप्स व्हेरिफिकेशन कोड विचारला जाईल. तो त्याच मोबाइलमध्ये संदेशद्वारे येईल. तो नोंद केल्यानंतर या अ‍ॅप्सचा वापर आणीबाणीच्या वेळेस करता येऊ  शकेल.

अ‍ॅपमधील सुविधा

महिलांसाठी हेल्पलाइन, अँटी रॅगिंग, लहान मुलांसाठी हेल्पलाइन, रुग्णवाहिका सेवा, अग्निशमन सेवा, अपघात मदत, वाहतूक मदत, तसेच महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, नैसर्गिक आपत्ती व सायबर गुन्हे आदींची सुविधा अ‍ॅप्समध्ये देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना आलेले विविध अनुभव शेयर करण्याची आणि अपेक्षित असलेल्या सूचना नोंद करण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे.