डॉ. प्रकाश आमटे यांचे मत

उजाड जमिनीवर समाजाने नाकारलेल्या लोकांना सोबत घेऊन आनंदवन नामक स्वर्ग निर्माण केल्यावरही बाबा स्वस्थ बसले नाहीत. घनदाट अरण्यात अतिशय हलाखीचे जीवन जगणाऱ्या आदिवासींच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी काम करण्याची इच्छा १९७० मध्ये व्यक्त केली. भामरागडच्या त्या कार्याची जबाबदारी आम्ही उभयता स्वीकारली. त्यालाही आता ४२ वर्षे झाली. सुरुवातीचा काळ अतिशय हलाखीचा होता. दळणवळणाची साधने नव्हती. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा आणि दारिद्रय़ात खितपत पडलेल्या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आव्हानात्मक कार्य होते. बाबांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हेमलकसाला लोकबिरादरी प्रकल्प उभा राहिला. महाराष्ट्रात इतरत्रही ‘आनंदवन’समूहापासून प्रेरणा घेत सामाजिक प्रकल्प साकारले जात आहेत. अनेक तरुण त्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे देशाची परिस्थिती अगदी हाताबाहेर गेलेली नाही. सामाजिक भान असलेल्या तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य सुरक्षित असेल, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी अंबरनाथ येथे रविवारी एका कार्यक्रमादरम्यान केले.

येथील भगिनी मंडळ शाळेने आनंदवन समूहातील सर्व प्रकल्पांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्त डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी हे आमटे दाम्पत्य अंबरनाथमध्ये आले होते. सकाळी शाळेच्या स्नेहसंमेलन सोहळ्यासही ते उपस्थित होते. संध्याकाळी महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात त्यांचा शहरवासीयांच्या वतीने ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दा. कृ.सोमण यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
सकाळी स्नेहसंमेलनात तसेच नागरी सत्कारानंतर दोन्ही वेळी डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या सविस्तर मनोगतात लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती दिली. ‘बाबांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवनची निर्मिती केली असली, तरी ते सर्व दु:खीतांचे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमुळे समाजातील दारिद्रय़, विषमता, शोषण आणि अन्याय दूर होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे, भगिनी मंडळ शाळेच्या सचिव डॉ. पूर्वा अष्टपुत्रे, एज्युकेशन सोसायटी, शहरातील दोन्ही रोटरी क्लब, लायन्स क्लब, अंबरनाथ जयहिंद बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, धनश्री महिला पतपेढी, आदी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
अंबरनाथकरांकडून सहा लाखांची मदत
अंबरनाथकरांच्या वतीने लोकबिरादरी प्रकल्पासाठी सहा लाखांहून अधिक रक्कम मदत म्हणून देण्यात आली. रात्री उशिराही अनेकांनी उत्स्फूर्तपणे मदत दिली.
प्रदर्शन मंगळवापर्यंत
अंबरनाथ पश्चिम गावदेवी विभागातील भगिनी मंडळ शाळा क्रमांक दोनमध्ये आनंदवन समूहातील सर्व प्रकल्पांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन उभारण्यात आले आहे. प्रदर्शन मंगळवार, ८ डिसेंबपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ६ यावेळेत सर्वाना पाहण्यासाठी खुले आहे.