‘साई’च्या गटाला मान्यता न मिळाल्याने भाजपपुढे पेच;नगरसेवक गळाला लावण्यासाठी शिवसेनेचेही प्रयत्न

उल्हासनगरमध्ये भाजपला महापौरपद मिळवून देण्यासाठी पाठिंबा जाहीर करणाऱ्या साई पक्षाची गट म्हणून मान्यताच रद्द झाल्याने येत्या बुधवारी होणारी महापौरपदाची निवडणूक रंगतदार अवस्थेत येऊन ठेपली आहे. साई पक्षाची गट म्हणून नोंदणी न झाल्याने या पक्षातील नगरसेवकांना पक्षादेश बांधील राहणार नसल्याचा फायदा घेऊन शिवसेनेतर्फे या पक्षातील काही नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर दगाफटका नको म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना शहराबाहेर अज्ञात स्थळी नेऊन ठेवले आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ओमी कलानी यांच्याशी हातमिळवणी करत ३२ जागा जिंकल्या, परंतु बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ गाठण्यासाठी त्यांना ११ जागा मिळवणाऱ्या साई पक्षाच्या मदतीची गरज आहे. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून येईल, अशी चिन्हे होती, परंतु ‘साई’ पक्षाची गट म्हणून नोंदणीच न झाल्याने ही निवडणूक आता चुरशीची होण्याची शक्यता आहे.

साई पक्षाच्या गटाला मान्यता नसल्याचे पत्र नुकतेच कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला पाठवले आहे. यामुळे आता साई पक्ष महापालिका सभागृहात गट म्हणून नसेल. परिणामी या पक्षांच्या नगरसेवकांना पक्षादेश पाळण्याचे बंधन असणार नाही. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेऊन शिवसेनेने साई पक्षातील काही नगरसेवकांना आपल्याकडे आणण्याची व्यूहरचना आखल्याचे समजते.

पालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपला लक्ष्य करणाऱ्या साई पक्षाचे प्रमुख इदनानी यांनी निकालानंतर भाजपला पाठिंबा जाहीर केल्याची बाब या पक्षात असलेल्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पटलेली नसल्याचे बोलले जाते. या पक्षांतर्गत कुरबुरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना करीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेसचा एक, रिपाइंचे दोन आणि पीपल्स रिपब्लिकन पक्ष तसेच अन्य एका नगरसेवकासह शिवसेनेने आपली संख्या ३४ इतकी वाढवली. मात्र तरीही त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी सहा नगरसेवकांची गरज असून त्यासाठी त्यांनी पूर्वी शिवसेनेत असलेल्या साई पक्षाच्या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

नगरसेवक अज्ञातस्थळी

महापौर निवडणुकीत घोडेबाजार तेजीत येण्याच्या शक्यतेने सर्वच पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी पाठवल्याचे समजते. मतदानाच्या दिवशीच त्या नगरसेवकांना शहरात आणले जाणार असल्याचे बोलले जाते. दरम्यान, साई पक्षाचे नगरसेवक भाजप नगरसेवकांसोबत महाबळेश्वर येथे असल्याचे कळते आहे. जीवन इदनानी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून आम्ही भाजपसोबतच असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससह इतर मित्रपक्षांच्या नगरसेवकांना ठाण्याजवळील हॉटेलमध्ये ठेवल्याचे कळते आहे.

पक्षीय बलाबल

* भाजप- ३२

* शिवसेना- २५

* साई- ११

* राष्ट्रवादी काँग्रेस- ४

* रिपाइं- २

* काँग्रेस- १

* भारिप बहुजन महासंघ- १

* पीपल्स रिपब्लिकन पार्टी- १

* भाजप पुरस्कृत रासप-१

७८ एकूण

बहुमतासाठी आवश्यक ४०