राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत डावखरे यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली, तेव्हाच राजकीय घोडेबाजाराला ऊतयेणार हे स्पष्ट झाले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तर एका नगरसेवकाचा दर सात लाखांच्या घरात पोहोचल्याची अगदी उघड चर्चा होती. हक्काचे मतदार फुटू नये यासाठी त्यांनाही दोन ते तीन लाखांचा नैवेद्य दाखविण्याची खबरदारी घेण्यात आली. मात्र या सगळ्या खोटय़ा प्रतिष्ठेच्या लढाईनंतर सर्वसामान्यांच्या पदरी फार काही पडेल ही अपेक्षा करणे मुळात धाडसाचे म्हणावे लागेल.
विधान परिषदेच्या ठाणे, पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठय़ा मताधिक्याने विजय मिळवत शिवसेनेने जिल्ह्य़ाच्या राजकारणावरील पकड पुन्हा एकदा सिद्ध केली. असे असले तरी गेल्या दोन आठवडय़ांपासून या निवडणुकीनिमित्त सुरू असलेला घोडेबाजार लक्षात घेता या निकालाचे काही सकारात्मक परिणाम या दोन्ही जिल्ह्य़ांमधील सर्वसामान्यांच्या आयुष्यात दिसण्याची शक्यता तशी कमीच म्हणावी लागेल. पुरेसे संख्याबळ पदरी नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत डावखरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली, तेव्हाच घोडेबाजाराला ऊतयेणार हे स्पष्ट झाले होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात तर एका नगरसेवकाचा दर सात लाखांच्या घरात पोहोचल्याची अगदी उघड चर्चा होती. हक्काचे मतदार फुटू नये यासाठी त्यांनाही दोन ते तीन लाखांचा नैवेद्य दाखविण्याची खबरदारी घेण्यात आली. गोवा, महाबळेश्वर, लोणावळा, अलिबाग, कर्नाळा अशा ठिकाणी राजकीय पर्यटन घडवून कोटय़वधी रुपयांचा दौलतजादा करण्यात आला. एका उमेदवाराने तर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मतदारांच्या विमान खर्चावर दीड कोटी रुपयांचा खर्च केल्याचे बोलले जाते. विधान परिषदेच्या एका जागेसाठी कोटय़वधी रुपयांचा पाऊस पाडला जात असताना या सगळ्या खोटय़ा प्रतिष्ठेच्या लढाईनंतर सर्वसामान्यांच्या पदरी फार काही पडेल ही अपेक्षा करणे मुळात धाडसाचे म्हणावे लागेल.
विधान परिषदेच्या ठाणे, पालघर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमध्ये उभी-आडवी फूट पाडत शिवसेनेने एकतर्फी असा विजय मिळवला. सर्वपक्षीय समझोत्याच्या राजकारणात एरवी मातब्बर मानले जाणारे वसंत डावखरे यांनी ही निवडणूक लढवू नये असे अनेकांचे मत होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता डावखरे यांना विजयाचे गणित बांधणे सोपे नव्हतेच. तरीही वसईच्या राजकारणातील सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या १२५ मतांचे समर्थन गृहीत धरत डावखरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेच. त्यांचे आणि शिवसेना नेतृत्वाचे वर्षांनुवर्षे निकटचे संबंध. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना मातोश्रीवरील निकटच्या संबंधाचा त्यांनी आपल्या व्यक्तिगत राजकारणासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला. स्वर्गीय आनंद दिघे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा हवाला देत स्थानिक राजकारणातही डावखरे यांनी नेहमीच शिवसेनेशी सौहार्दाचे संबंध जोपासण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेची आमदारकी बिनविरोध पदरात पाडून घेत डावखरे यांनी सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. या वेळीही असेच काही तरी करता येईल या भ्रमात ते राहिले. गेल्या काही वर्षांत ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट झाली आणि शिवसेना-भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर भागात तर काँग्रेस, राष्ट्रवादीला दोन आकडी संख्याबळही गाठता आले नव्हते. खरे तर डावखरे यांना तेव्हाच बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज यायला हवा होता. वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला दणदणीत यश मिळाले आणि डावखरेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला पुन्हा एकदा धुमारे फुटले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विकास आघाडी यांचे संख्याबळ एकत्रित केले तरीही डावखरे ७५ मतांनी मागे होते. राज्यात शिवसेना-भाजप या दोन मित्रपक्षांत सातत्याने खटके उडत असल्याने भाजपच्या ताब्यातील १८९ मतांची रसद आपल्याकडे वळविता येईल, असा विश्वास डावखरे गटाकडून व्यक्त होत होता. शिवाय शिवसेनेसोबत वर्षांनुवर्षे जोपासलेले मैत्रीचे नाते यंदाही कामी येईल असेही त्यांना वाटत असावे. दुसरीकडे वाढत्या संख्याबळामुळे यंदा डावखरे आपल्याकडे आले तर ठीक अन्यथा त्यांना मदत करायची नाही, असे स्पष्ट मत शिवसेना नेतृत्वाने स्थानिक शिलेदारांना कळविले होते. डावखरे यांच्यापर्यंत हा निरोपही पोहोचविण्यात आला होता. त्यामुळे या निवडणुकीच्या फंदात न पडलेलेच बरे, असे डावखरे यांचे निकटवर्तीय खासगीत सातत्याने बोलून दाखवीत होते. मनातले साहेबांपर्यंत पोहोचवायच्या फंद्यात मात्र कुणी पडले नाही आणि तेथूनच सर्वसामान्यांना उबग येईल अशा पद्धतीने पैशाचा बाजार मांडणाऱ्या या निवडणुकीचा श्रीगणेशा झाला.
हा बाजार कुणासाठी?
डावखरे रिंगणात असल्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पणाला लागली होती. त्यामुळे शिवसेनेकडून रवींद्र फाटक हे उमेदवार असले तरी खरी लढत डावखरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे अशीच होती. या लढतीत डावखरे यांना पराभवाची धूळ चारत शिंदे यांनी संख्याबळाचे गणित जमविण्यात आपण कसे माहीर आहोत हे पुन्हा एकदा दाखवून दिले. त्यामुळे हा विजय शिवसेनेसाठी निश्चितच सुखावणारा असला तरी ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील सर्वसामान्यांना या निकालाने नेमके काय दिले, हा प्रश्न मागे उरतोच. डोंबिवली स्फोटापाठोपाठ आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या आगीमुळे सर्वसामान्य कल्याणकरांचा जीव गुदमरू लागला असताना या भागातील शिवसेना-भाजपचे नगरसेवक अलिबाग येथील फार्म हाऊसवर आपल्यातील एकाचा वाढदिवस करण्यात मग्न होते. गोव्याला फुकटचे पर्यटन घडणार म्हणून नगरसेवक कुटुंबकबिल्यासह विमान प्रवासाला निघाले. बायका, पोरे, सुना, नातवंडांसह निघालेला हा कुटुंबकबिला पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. प्रभागातील कामे व्हावीत, शहरविकासाला दिशा मिळावी यासाठी मोठय़ा अपेक्षेने निवडून दिलेले आपले नगरसेवक निवडणुकीच्या बाजारात यथेच्छ हात धुऊन घेत असल्याचे पाहून सर्वसामान्यांच्या मनात संतापापेक्षा पश्चात्तापाची भावना डोकावून गेली असल्यास आश्चर्य वाटू नये. स्वपक्षातून फार काही पदरात पडत नसल्याचे पाहून नगरसेवक म्हणवून घेणाऱ्या यापैकी अनेकांनी निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झालेल्या दलालांसोबत संपर्क साधला. प्रत्येक मताची बोली लावली गेली. स्वपक्षातील नाराज होऊ नयेत यासाठी दोन ते तीन लाखांचा नैवेद्य चढविला गेला. उपऱ्यांकडून मदतीसाठी पाच ते सात लाखांची बोली लागली. राजकीय प्रतिष्ठेपायी पाच-पन्नास कोटींचा चुराडा केला जात असताना या निवडणुकीतून साधले तरी काय जाणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला नसेल तर नवलच. या निकालानंतर विधान परिषदेत ठाणे आणि आसपासच्या शहरांमधील नागरी प्रश्नांचा आवाज बुलंद व्हायला हवा, अशी अपेक्षा बाळगायला एरवी हरकत नव्हती. मात्र, प्रत्येक मतासाठी लावली गेलेली बोली आणि नैवेद्याचे दान पदरात पाडून घेण्यासाठी रांगा लावणारे लोकप्रतिनिधी हे चित्र पाहाता या निवडणुकीमुळे फार काही दिव्य घडेल ही अपेक्षाच करणे म्हणजे स्वत:चा मुखभंग करून घेण्यासारखे. या निकालाचा सर्वसामान्यांनी काढायचा तो अर्थ एवढाच!
जयेश सामंत