|| सुहास बिऱ्हाडे

वसई- विरार महापालिकेचे दुर्लक्ष; पोलिसांकडून बेवारस वाहने उभी करण्यासाठी वापर :- वसई-विरार शहरातील अनेक विकासाचे प्रकल्प रखडले असताना आरक्षित भूखंडांचा विकास केला जात नसल्याने ते गिळंकृत केले जात आहेत. नालासोपारामधील रुग्णालयाच्या जागेसाठी आरक्षित असलेल्या १२ एकर जागेचा भूखंड गेल्या दहा वर्षांपासून पालिकेने विकसित केला नसल्याने त्यावर अतिक्रमण होण्यास सुरुवात झालेली आहे.

महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांसाठी भूखंड आरक्षित करण्यात आले होते. मात्र हे भूखंड ताब्यात घेऊन ते विकसित केले जात नसल्याने या भूखंडावर अतिक्रमण होत आहे. विकासकामे करण्यासाठी जागा नसल्याचे कारण पालिकेकडून दिले जात आहे तर दुसरीकडे आरक्षित असलेले भूखंड सांभाळत नसल्याने त्यावर अतिक्रमण होत आहे. नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील भूमापक क्रमांक सहामध्ये पालिकेच्या रुग्णालय आणि क्रीडांगणासाठी १७ एकर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. पालिकेच्या विकास आराखडय़ात ही जागा रुगणालयासाठी  आरक्षित म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. ही जागा १० वर्षांपूर्वीच महापालिकेला राज्य शासनाने हस्तांतरित केलेली आहे. मात्र आजतागायत पालिकेने या जागेचा विकास केलेला नाही. त्यामुळे या जागेवर आता अतिक्रमण होऊ  लागले आहे.

ही जागा पडीक असल्याने पोलीस जप्त केलेली वाहने या जागेत आणून टाकतात. आता काही व्यक्तींनी या जागेवर अनधिकृत बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारे हळूहळू अनधिकृत बांधकामे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ही संपूर्ण जागा जर अतिक्रमण झाले तर पुन्हा पालिकेला ताब्यात घेता येणार नाही आणि हा मोक्याच्या जागेवरील भूखंडही पालिकेच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. एव्हरशाईन सिटीच्या शेवटी आणि आचोळे येथील मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे. पालिकेने ही जागा ताब्यात घेऊन सुरक्षा भिंत बांधली तसेच सपाटीकरण केले तर जागा सुरक्षित राहू शकणार आहे.

शहरात सुसज्ज आणि अद्ययावत रुग्णालयाची गरज आहे. जागेची अडचण असल्याचे पालिका सांगत आहे. मात्र हक्काच्या जागेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पालिकेच्या विकास आराखडय़ाची मुदत पुढील वर्षी संपत आहेत. त्यावेळी नमूद केलेली सर्व आरक्षणे विकसित झालेली नसतील तर ती सर्व आपोआप रद्द होतील आणि शासन जागा परत घेऊ  शकते.

 

माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार वसई विभागामध्ये ५०.६९ टक्के, नालासोपारा विभागामध्ये ७७.३७ टक्के तर विरार विभागामध्ये ३०.४५ टक्के राखीव भूखंडांवर अनधिकृत इमारती आणि अतिक्रमण झालेले आहे. सर्वाधिक म्हणजे ९०.६७ टक्के अतिक्रमणे प्रभाग ‘ब’ मध्ये झालेले असून सर्वात कमी म्हणजे २९.८९ टक्के अतिक्रमण प्रभाग समिती ‘क’ मध्ये झालेले आहे. हे आरक्षित भूखंड शाळा, खेळण्याचे मैदान, उद्यान, पोलीस ठाणे, कचराभूमी, बफर झोन आदी कामांसाठी आरक्षित करण्यात आले होते. राखीव भूखंडाची माहिती देणारे फलक प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर धूळ खात पडले आहे. राखीव भूखंडावर पालिकेने लक्ष न देता जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याने भूमाफिया जागा हडप करत आहेत.

भूमाफियांकडून डल्ला

माहिती अधिकारात मिळालेल्या आकडेवारीनुसार वसई विभागामध्ये ५०.६९ टक्के, नालासोपारा विभागामध्ये ७७.३७ टक्के तर विरार विभागामध्ये ३०.४५ टक्के राखीव भूखंडांवर अनधिकृत इमारती आणि अतिक्रमण झालेले आहे. सर्वाधिक म्हणजे ९०.६७ टक्के अतिक्रमणे प्रभाग ‘ब’ मध्ये झालेले असून सर्वात कमी म्हणजे २९.८९ टक्के अतिक्रमण प्रभाग समिती ‘क’ मध्ये झालेले आहे. हे आरक्षित भूखंड शाळा, खेळण्याचे मैदान, उद्यान, पोलीस ठाणे, कचराभूमी, बफर झोन आदी कामांसाठी आरक्षित करण्यात आले होते. राखीव भूखंडाची माहिती देणारे फलक  प्रभाग समितीच्या कार्यालयाबाहेर धूळ खात पडले आहे. राखीव भूखंडावर पालिका  लक्ष देत नसल्याने भूमाफिया जागा हडप करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाकडे ही आरक्षित जागा ताब्यात घेऊन विकसित करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. – नीलेश देशमुख, सभापती, ड प्रभाग समिती