रुग्णालयातून व्हिडीओ कॉलद्वारे संभाषणाची सुविधा

ठाणे : करोनाची बाधा झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार होऊन घरी परतेपर्यंत त्याची कुटुंबीयांशी भेट होतच नाही. त्यामुळे एकीकडे रुग्णाच्या मनात एकटेपणाची भावना तीव्र होते, तर रुग्णाच्या प्रकृतीबाबत समजत नसल्याने त्याचे कुटुंबीयही धास्तावले जातात. ही मानसिक घालमेल दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांत दिवसातून दोनदा संवाद घडवून आणण्याचा उपक्रम सुरू केला आहे. महापालिका तसेच खासगी कोविड रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

करोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्यांचा कुटुंबीयांशी थेट संपर्क पूर्णपणे तुटतो. करोना चाचणी अहवाल सकारात्मक अहवाल आल्यानंतर रुग्णाला घर ते रुग्णालयपर्यंतचा प्रवास रुग्णवाहिकेतून एकटय़ालाच करावा लागतो. रुग्णालयातील उपचाराच्या कालावधीत कुटू्ंबीयांची प्रत्यक्ष भेट होत नसल्यामुळे रुग्णाच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होते. काही वेळेस एखाद्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जात नाही. त्याच्यावर परस्पर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांची मानसिक अवस्था वाईट होते. या पाश्र्वभूमीवर रुग्ण आणि नातेवाईकांची भेट घडवून देण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी व्हिडीओ कॉल उपक्रमाची सुरुवात नुकतीच केली आहे. सुरुवातीला महापालिकेच्या बाळकुममधील कोविड रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात आला आणि त्यानंतर तो खासगी कोविड रुग्णालयांमध्येही राबविण्यास सुरुवात झाली आहे.