17 January 2021

News Flash

रुग्णालयांचे पुनर्परीक्षण

भंडारा जिल्हा दुर्घटनेनंतर वसई-विरार पालिकेची खबरदारी

|| प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

भंडारा जिल्ह्यत झालेल्या अग्निकांडाने वसई-विरार महापालिकेने खबरदारी घेतली आहे. पालिकेने शहरातील तसेच स्वत:च्या रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढले आहेत.

पालिकेने आपली बाजू सांभाळत त्याच्या शासकीय रुग्णालयाचे पुन्हा अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे ठरवले आहे पण इतर आस्थापना यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका केवळ दुर्घटनेनंतर जागे होणार काय, असा सवाल भाजप उपजिल्हा अध्यक्ष मनोज पाटील यांनी उपस्थित केला आहे. यामुळे इतर आस्थापनांच्या बाबतीत पालिका अजूनही उदासीन आहे.

शहरातील शिकवण्या, शाळा, गृहसंकुले, औद्योगिक वसाहती, त्याच्याबरोबर कारखाने, चित्रपटगृहे अशा अनेक आस्थापना आजही वसईत विनाअग्नीसुरक्षा लेखापरीक्षण आपली दुकाने चालवत आहेत. केवळ एका दाखल्यावर सर्व कारभार चालवला जात आहे. यामुळे अनेक आस्थापना या आगीच्या कचाटय़ात सापडत असतानाही पालिका बघ्याची भूमिका घेत आहे. वसई-विरार महापालिका स्थापनेपासून वसई, विरारमधील कोणत्याही आस्थापनेचे अग्नी सुरक्षा लेखापरीक्षण झाले नाही.

पालिका वैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरामध्ये २६० खाजगी रुग्णालये आहेत. त्यात पालिकेकडे २ रुग्णालये, २१ हेल्थ सेंटर ८ दवाखाने आणि ३ माता- बालसंगोपन केंद्रे आहेत. यात नोंदणी न झालेल्या रुग्णालयाची संख्या अधिक आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण झाल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला परवानगी दिली जात नाही. पण दिलेली परवानगी केवळ वर्षभरासाठी असताना इतर वेळी त्या उपकरणाची कोणतीही तपासणी होत नाही. केवळ कागदी घोडय़ांवर अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण अहवाल तयार केले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागील चार वर्षांत शहरात लागलेल्या आगीचा आकडा पाहता सन २०१७ रोजी ६८६, सन २०१८ मध्ये ८१९, सन २०१९ मध्ये ८०३, सन- २०२० मध्ये ६५९ आगी लागल्या आहेत. शहरात अनेक लहान- मोठय़ा औद्योगिक वसाहती, गोदामे, विद्युत उपकरणे, यासह इतर ठिकाणी अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना होणे गरजेचे असताना पालिका केवळ दुर्घटना झाल्यानंतरच जागे होत आहे. या अगोदर पालिकेने गुजरातमध्ये शिकवणीमध्ये झालेल्या अग्नीकांडानंतर शहरातील शिकवण्यांना अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण करण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. पण करोनाकाळात शिकवण्या बंद असल्याने ही मोहीमसुद्धा बासनात गुंडाळली.

आम्ही रुग्णालयात, शाळा, शिकवणी, तसेच मॉल, सर्व वाणिज्य आस्थापना यांना अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण सक्तीचे केले आहे, तसेच त्यांचे आठवडय़ाचे अहवालसुद्धा अग्निशमन दलाला सदर करण्याचे आदेश दिले आहेत.    – आशीष पाटील, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 1:41 am

Web Title: hospital review in vasai virar municipality mppg 94
Next Stories
1 श्रेय घेणारे तेव्हा कुठे होते?
2 ठणठणाटानंतर पालिकेला जाग!
3 बगळय़ांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच
Just Now!
X