ठाण्यात शुल्क आणि परवानग्यांचे जंजाळ; कराच्या दरात सुसूत्रता आणण्याची मागणी
ठाणे महापालिकेने रुग्णालय चालविण्यासाठी नव्याने आखलेल्या शुल्कामुळे महापालिका हद्दीतील रुग्णालय व्यवस्थापनांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. नाशिक, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि पुणे येथील महापालिकेच्या तुलनेत ठाणे महापालिकेकडून केली जाणारी शुल्क वसुली अवाच्यासवा आहे, अशी तक्रार डॉक्टर आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे. राज्यातील ही सर्वात महाग रुग्णालयसेवा असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेने रुग्णालयांना आकारल्या जाणाऱ्या कराच्या दरात सुसूत्रता आणण्याची विनंती जयस्वाल यांना केली.
ठाणे शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर आणि रुग्णालयांच्या नोंदणीसाठी ठाणे महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रत्येक रुग्णालयाच्या नोंदणीचे शुल्क वेळेवर प्राप्त होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महापालिकेने कठोर पद्धतीने शुल्क वसुली सुरू केली असून हे शुल्क इतर महापालिकेच्या शुल्कापेक्षा कैकपट अधिक असल्याची बाब संघटनेच्या निदर्शनात आली आहे. ठाण्यातील वैद्यकीय व्यावसायिकांचा समावेश फॅक्टरी कायद्यानुसार केला असल्याने शहरातील रुग्णालयांना वेगवेगळे परवाने आणि शुल्क प्रत्येक वर्षी भरावे लागत आहेत. याचा फटका रुग्णालयांप्रमाणेच अप्रत्यक्षपणे रुग्णांनाही सहन करावा लागत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेच्यावतीने याविषयी महापालिका प्रशासनाकडे भूमिका मांडली असून हे शुल्क इतर महापालिकांप्रमाणे कमी करण्यात यावे, अशी विनंती डॉक्टरांच्या संघटनेने केली.

अन्य शहरांच्या तुलनेत अधिक शुल्क
ठाणे शहरात नर्सिग होम शुल्क ९ खाटांसाठी २० हजार रुपये इतके आहे. नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूर, पुणे इथे हे शुल्क एक हजाराहूनही कमी आहे.
या महापालिकांमध्ये अग्शिनमन ना हरकत दाखल्याची मुदत तीन वर्षांची आहे. ठाणे महापालिका हद्दीत ही मुदत केवळ सहा महिन्यांची आहे. त्यामुळे प्रत्येक सहा महिन्यांनंतर डॉक्टरांना हा परवाना घेण्यासाठी शुल्क भरावे लागते.
वैद्यकीय घनकचरा शुल्कातही इतर शहराच्या तुलनेत अधिक पैसे आकारले जातात. तसेच ट्रेड परवाना बंधनकारक केल्यामुळे वर्षांकाठी ६ ते ८ हजार रुपये रुग्णालयांना भरावे लागतात. अन्य शहरांमध्ये असे कोणतेच शुल्क आकारले जात नाही.
घनकचरा व्यवस्थापनाचाही कर महापालिकेने सुरू केला आहे. इतर शहरांच्या तुलनेत ठाणे शहरात असलेली शुल्कांची तफावत दुरू करून योग्य शुल्क आकारण्याची मागणी डॉक्टर संघटनांनी केली आहे.

नोंदणी शुल्क, अग्निसुरक्षा शुल्क, वैद्यकीय कचरा, ट्रेड परवाना आणि घनकचरा व्यवस्थापन असा वेगवेगळ्या नावाचे कर येथील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना द्यावे लागतात. अन्य महापालिकेमध्ये यापैकी काही कर अत्यल्प आहेत, तर काही कर हे तेथे अस्थित्वातही नाही. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत ठाण्यातील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना जास्तीचे शुल्क भरावे लागत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन या कर वसुलीमध्ये सुसूत्रता आणावी.
– डॉ. दत्ता पाणंदिकर, इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे शाखा.