बदलापूर : करोनाच्या संसर्गावर नियंत्रणासाठी केलेल्या टाळेबंदीत हॉटेल, ढाबे बंद होते. मात्र टाळेबंदीतील शिथिलतेनंतर सुरू झालेल्या हॉटेल आणि ढाब्यांमध्ये छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब समोर आली आहे.  उल्हासनगरमध्ये गेल्या काही आठवड्यात दोनदा मोठ्या हुक्का पार्लरवर कारवाई झाली होती. आता बदलापूरमध्येही अशा कारवाईची मागणी होते आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात गांजा आणि इतर अमली पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर पोलीस सातत्याने कारवाई करत आहेत. मात्र, त्यानंतरही या क्षेत्रातील अमली पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलेले दिसत नाही. टाळेबंदीच्या काळात राज्यातील जवळपास सर्वच हॉटेल आणि ढाबे बंद होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर आता ढाबे आणि हॉटेल सुरू झाले आहेत. त्यापैकी काही ढाबे आणि हॉटेलांमध्ये हुक्का पार्लर छुप्या पद्धतीने सुरू झाल्याची बाब समोर आली आहे. यातील काही ढाबे आणि हॉटेल शहराच्या वेशीवर तर काही ग्रामीण भागात आहेत. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी हॉटेल आणि ढाबेचालकांकडून फ्लेवर हुक्काची जाहिरात केली जाते. समाज माध्यमांमधून ही जाहिरात करत तरुणांना ओढण्यात येते. पुढे फ्लेवर हुक्क्यापासून खऱ्या हुक्क्यापर्यंत तरुणांना अमली पदार्थ दिले जातात, अशी माहिती मिळते आहे.  उल्हासनगर शहरापुरते मर्यादित  हुक्का पार्लरचे जाळे अंबरनाथ तालुक्यात आणि विशेषत: बदलापूर शहरात पसरण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

आलिशान गाड्यांचा वापर

एप्रिल २०१८ मध्ये बदलापूर शहरातील एका बंद कंपनीतून तब्बल सात कोटी रुपयांचा द्रवरूप मेफेड्रॉनचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याच्या तीन दिवसांनंतरच कल्याणच्या प्रादेशिक विभागाच्या विशेष पोलीस पथकाने बदलापुरातून २०७ किलो गांजा हस्तगत केला होता.  शहरात अशा अनेक लहानमोठ्या कारवाया केल्या गेल्या आहेत. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात हे प्रकार अधिक होत असून यासाठी आलिशान गाड्यांचा वापरही करण्यात येत असल्याचे यापूर्वी उजेडात आले होते.

शहरात असे हुक्का पार्लरचे प्रकार सुरू असल्यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना या बेकायदा गोष्टींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.

– विनायक नरळे, सहायक पोलीस आयुक्त, अंबरनाथ